पुण्यातील चिमण्या मारुती चौकातून MPSC विद्यार्थी प्रसाद सूर्यवंशीचे अपहरण करण्यात आले होते. विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करून दोघांना अटक केली आह
शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मध्यरात्री पुण्यातील मध्यवर्ती भागातून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एकाच तरुणीशी फोनवर संपर्कात असण्यावरून निर्माण झालेल्या वादातून आणि रागाच्या भरात मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मात्र, विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
Pune Crime News: नेमकी काय घडली घटना?
प्रसाद सूर्यवंशी असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसाद हा पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रसाद हा पुण्यातील प्रसिद्ध चिमण्या मारुती चौक परिसरात उभा होता. त्यावेळी अचानक तिथे एका चारचाकी गाडीतून आरोपी आले. “तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” असा जाब विचारत आरोपींनी प्रसादला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आतच त्याला बळजबरीने गाडीत कोंबून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच आखला अपहरणाचा कट
पुण्यात MPSC ची तयारी करणारी एक तरुणी अपहरण झालेला विद्यार्थी प्रसाद सूर्यवंशी आणि मुख्य आरोपी या दोघांशीही फोनवरून सतत बोलत होती. ही गोष्ट आरोपी तरुणाच्या लक्षात आल्यावर त्याच्या मनात तीव्र राग निर्माण झाला. आपल्या मैत्रिणीचे दुसऱ्या मुलाशी बोलणे सहन न झाल्याने आरोपीने स्वतःच्या मित्राला सोबत घेतले आणि थेट पुण्यात येत प्रसादचे अपहरण करण्याचा कट रचला.
विश्रामबाग पोलिसांची तत्परता आणि थरारक कारवाई
मध्यरात्री चिमण्या मारुती चौकातून तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ हरकतीत आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गाडीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी गाडी घेऊन सिंहगड रोड परिसराच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परतेने सिंहगड रोड परिसरात सापळा रचून गाडी अडवली आणि प्रसाद सूर्यवंशीची सुखरूप सुटका केली.
दोघांना अटक, इतर दोघांचा शोध सुरू
या कारवाईदरम्यान विश्रामबाग पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे, तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोन फरार साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या थरारक नाट्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असला, तरी विश्रामबाग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.



















