पहाटे पहाटे चांगल्या आरोग्यासाठी मोर्निंग वॉकला तुमच्यापैकी बरेच जन जात असतील. संभाजीनगर मध्ये असंच एक महिला नेहमीसारखी मॉर्निंग वॉकला निघाली. वाळूंज परिसरात कालिका मंदिराजवळून ती कारगिल मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत होती. तिच्या मागून काहीजण तिचा पाठलाग करत येत होते, आजूबाजूला कोणी नाही हे पाहून अचानक चाकूचा धाक दाखवून एकजण समोर आला आणि काही समजायच्या आत त्याने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. तिने आरडा ओरडा केला पण तोपर्यंत ते चोर पळाले… संभाजीनगर शहरात घडलेली ही एकच घटना नाही तर गेल्या काही वर्षा पासून…. प्रत्येक आठवड्यात एक तरी अशी घटना घडत आहे, अशाच कित्येक महिलांना या टोळीने टार्गेट केलं होतं, पण या घटनेने काही चोर पोलिसांच्या हाती लागले असून आज त्या सहाही जणांवर पडला मोक्का लावण्यात आला आहे…
तर या चोरांना पोलिसानी कसे पकडले अश्या गुन्ह्यासाठी प्रत्येकवेळी चोरावर मकोका लागणार का ? पोलिसांची यावर काय भूमिका आहे ? सविस्तर पाहूया
छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना वाढत होत्या. सकाळची वेळ, एकट्या महिला, कमी रहदारी असलेले रस्ते… आणि गाडीवरून मागून येणारी माणसे. हे प्रकार इतक्या सफाईने होत होते की मंगळसूत्र हिसकावून बघता बघता ते चोर दिसेनाशे होत होते. पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा एकापाठोपाठ एक घटना घडत राहिल्या. शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. मॉर्निंग वॉकला बाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न पडू लागला होता. पोलिसांना संशय येऊ लागला होता की हे एका टोळीचे काम आहे.
दिनांक 20 मे 2026 रोजी पहाटे साधारण पाच वाजून छपन्न मिनिटांची वेळ होती फिर्यादी महिला कालिका मंदिराजवळून कारगिल मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने चालत होत्या. रस्त्यावर अंधुक प्रकाश होता, गर्दी नव्हती. अचानक त्यांच्या मागून तीन जण आले, अमन शेख, आदित्य काळे आणि शेख अल्ताफ. त्यांनी त्या महिलेला चाकू दाखवला, धमकी दिली आणि एका झटक्यात त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. हे सगळं इतक्या fast घडले की त्या महिलेला काहीही करण्याची संधीच मिळाली नाही.
पण याच घटनेत सगळ्या टोळीचा पडदा फाश झाला, त्या तिघांनी मंगळसूत्र हिसकावून गुन्हा केला, हे खरे आहे पण या टोळीत फक्त हे तिघेच नव्हते तर जवळच उभ राहून रस्त्यावर नजर ठेवणारे, पोलीस येत नाही ना याची खात्री करणारे अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे हे रेकी करत होते. म्हणजे ही टोळी एखाद्या प्रोफेशनल ऑपरेशनसारखी काम करत होती. त्यात कोणी पुढे जात असे, कोणी मागे थांबत असे, कोणी दागिने हिस्कवायचे तर कोणी त्यांना पाळायला रस्ता मोकळा करून द्यायचा हे सगळे ठरलेल होते, या टोळी मध्ये सहावा आरोपी शेख सिराजुल हक हा देखील या टोळीचा भाग होता.
पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. जेव्हा चौकशी झाली तेव्हा समोर आले की हे सहाजण फक्त एखाददोन प्रसंगी एकत्र आलेले नव्हते. यांनी मिळून एक गुन्हेगारी टोळी बनवली होती आणि शहरातील अनेक महिलांना त्यांनी टार्गेट केले होते. प्रत्येक वेळी पद्धत तीच, पहाटे किंवा सकाळच्या वेळी रेकी करायची, एकट्या महिला हेरायच्या, सुनसान रस्ते पाहून ठेवायचे आणि चाकू दाखवायचा आणि मंगळसूत्र ओढून पळून जायचे. साधा चेन स्नॅचिंगचा गुन्हा इथपर्यंत सरळ होता. पण पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले. हे फक्त चोरी नाही, हे संघटित गुन्हेगारी आहे. आणि मग निर्णय घेण्यात आला. या सहाही जणांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली.
मोक्का म्हणजे Maharashtra Control of Organised Crime Act, 1999. हा कायदा महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी आणला होता. त्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहा महिने जामीनही मिळत नाही. टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांत किमान दोन गुन्हे दाखल असणे, ही अट या कायद्याखाली कारवाईसाठी लागते. याशिवाय या कायद्यात फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे मोक्का लागणे म्हणजे साधी अटक नाही, या अटकेत गुन्हेगार जवळजवळ संपतोच.
दिनांक 19 जून 2026 रोजी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मुख्य सूत्रधार अमोल वैजिनाथ गलाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध मोक्काचे कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) लावण्याची पूर्व परवानगी दिली. पोलीस उप-आयुक्त प्रशांत मोहिते, रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपुत, मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या टीमने हे संपूर्ण प्रकरण हाताळले आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग, श्री. मनोज पगारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सहाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मोक्काच्या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यांना जामीन मिळणे सहजासहजी शक्य नाही.
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी स्पष्ट मेसेज दिला आहे की महिलांना टार्गेट करून सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कोणत्याही टोळीला शहरात थारा दिला जाणार नाही. अशा संघटित गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही मोक्कासारख्या कठोर कायद्यांचा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी बजावले आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण फक्त सोनसाखळीचे नव्हते, तर एका नियोजित गुन्ह्गारीचे आणि नागरिकांमध्ये दहशद निर्माण करणारे प्रकरण होते, पण पोलींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, आज त्याच्यावर मोक्का लागला, पण जर पोलिसांनी अशा प्रत्येक गुन्ह्यावर याच ताकदीने कारवाई केली, तर शहरात अश्या गुन्ह्याचे प्रमाण शून्यावर येईल..आणि नागरिक कुठलीही भीती न बाळगता रात्री, पहाटे, दिवसा, सायंकाळी बिनधास्त फिरू शकतील… तुम्हाला काय वाटते पोलिसांनी अश्या गुन्हेगारावर कारवाई करायला पाहिजे का ? तुमचे मत कॉमेंट मध्ये नक्की लिहा,






