• Home
  • Breaking News
  • मनोज जरांगेंना भाजपचा पहिल्यांदाच थेट इशारा; मंत्री आशिष शेलार म्हणाले – “आमच्या नेत्यांचा अपमान आता खपवून घेतला जाणार नाही”
Image

मनोज जरांगेंना भाजपचा पहिल्यांदाच थेट इशारा; मंत्री आशिष शेलार म्हणाले – “आमच्या नेत्यांचा अपमान आता खपवून घेतला जाणार नाही”

मंत्री आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला आहे. “फडणवीस आणि शिंदेंवर एकेरी बोलणं आता खपवून घेतलं जाणार नाही,” असं शेलार म्हणाले. वाचा सविस्तर.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच उघडपणे थेट इशारा दिला आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दात हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी शब्दात बोललं जात असून त्यांचा अपमान केला जात आहे. हे आता मान्य केलं जाणार नाही, अशा शब्दात शेलार यांनी इशारा दिला.

“तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकार तुमच्या प्रश्नावर सकारात्मक आहे. आम्ही समाजासोबत आहोत. पण अपमानास्पद भाषा मान्य केली जाणार नाही. हे प्रकरण अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद पद्धतीने चाललंय ते बंद करा. सणासुदीला जनतेला त्रास होईल अशी भूमिका घेऊ नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या,” असं आशिष शेलार म्हणाले.

शिवराळ भाषेचा निषेध; “शिवरायांच्या राज्यात ही भाषा योग्य नाही”

आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या भाषेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठा समाजाचे प्रश्न गंभीर आणि योग्य आहेत. आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण तुमची ही भाषा चालणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही भाषा योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ही भाषा योग्य नाही. आम्ही तुमच्या शिवराळ भाषेचा निषेध करतो आणि या पुढे ही भाषा सहन करणार नाही,” अशा शब्दात शेलार यांनी स्पष्ट इशारा दिला.

शेलार यांनी एकनाथ शिंदे यांनी समाजाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून फडणवीस यांनी निर्णय घेतले आहेत, याकडेही लक्ष वेधले.

14 पैकी 13 मागण्या पूर्ण; सरकार चर्चेला तयार

सरकारने मराठा समाजासाठी न्यायाची भूमिका घेतली असून मराठा समाजाला अधिकार देण्याचं काम केलं आहे, असं शेलार यांनी सांगितलं. “बोलघेवडेपणा करणाऱ्यांनी काही केलं नाही. मराठा समाज हे जाणतो आहे. जरांगेंना विनंती आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून असतील तर त्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सणांच्यावेळी आंदोलन आणि कूच करणं बरोबर नाही,” असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच स्पष्ट केलं होतं की, सरकारने जरांगे पाटील यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य करून त्यावर कार्यवाही केली आहे. उर्वरित एक मागणी न्यायालयात प्रलंबित असल्याने ती लागू करता येणार नाही.

“आंदोलन अतर्क, अततायी आणि अपमानास्पद”

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं स्वरूप “अतर्क, अततायी आणि अपमानास्पद” असल्याचं शेलार यांनी म्हटलं. “अतर्क यासाठी म्हणतो ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, ज्या न्यायिक प्रक्रियेत टिकल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे. तरीही आंदोलन करणं अतर्क आहे. अततायीपणा यासाठी की, न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे. चर्चाही करत आहे. मंत्रिमंडळ गटाची स्थापना केली आहे. तरीही टोकाची भूमिका घेणं हा अततायीपणा आहे. आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे,” अशा शब्दात शेलार यांनी हल्ला चढवला.

जरांगे पाटील मुंबईकडे; पोलिसांनी तिसऱ्यांदा परवानगी नाकारली

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच सुरू केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून ते मुंबईच्या दिशेने निघाले असून 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी तिसऱ्यांदा नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असं कारण पोलिसांनी दिलं आहे.

जरांगे पाटील यांनी सांगितलं की, ते आपली आंदोलन भूमिका मागे घेणार नाहीत आणि मराठा समाजासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांनी आता मोठ्या गर्दीऐवजी फक्त पाच ते दहा सहकाऱ्यांसोबत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय वाद वाढण्याची शक्यता

भाजपने पहिल्यांदाच उघडपणे जरांगे पाटील यांना इशारा दिल्याने जरांगे आणि भाजप यांच्यात येत्या काळात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे पाटील यांनी यापूर्वीही भाजप नेत्यांवर टीका केली आहे, मात्र आता भाजपने थेट पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन टाळण्याचं आवाहन केलं आहे. “गणपती पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आंदोलनामुळे भाविकांना त्रास होऊ शकतो,” असं फडणवीस म्हणाले.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top