• Home
  • Breaking News
  • कोंढवा गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दादू भालेरावसह ६ सराईत आरोपी जेरबंद, पिस्तूल जप्त
Image

कोंढवा गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दादू भालेरावसह ६ सराईत आरोपी जेरबंद, पिस्तूल जप्त

कोंढव्यात गणपती मंडपाजवळ तरुणावर गोळीबार करणाऱ्या दादू भालेरावसह ६ सराईत आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

पुणे: गणेशोत्सवाच्या भक्तीमय वातावरणात कोंढवा परिसरात गणपती मंडपाजवळ तरुणावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई करत दादू भालेरावसह सहा सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर भागात गणपती मंडळाच्या मांडवाजवळ ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ त्रिबंके हे त्यांचा मित्र सागर पंधरकर याच्यासोबत गणपती मंडळाच्या मांडवाजवळ गप्पा मारत उभे होते. आरोपींचे सागर पंधरकरसोबत पूर्वी वाद झाले होते. त्याच रागातून आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा आणि अन्य आठ ते दहा जणांनी एकत्र येत परिसरात आरडाओरड करून दहशत निर्माण केली.

फिर्यादीनुसार, दादू भालेराव याने जवळील पिस्तुलातून सौरभ त्रिबंके यांच्या दिशेने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.

पोलिसांची धडक कारवाई

तपासादरम्यान कोंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव (वय २२, रा. येवलेवाडी), लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या शिवाजी गजरमल (वय २६, रा. कोंढवा बुद्रुक), प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दिनेश रामदास घाडगे (वय २५, रा. कोंढवा बुद्रुक), कार्तिक महादेव पांडागळे (वय १९, रा. कोंढवा बुद्रुक) आणि विजय रामदास चोंधे (वय १८, रा. येवलेवाडी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले असून, आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

तपास सुरू

पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या तरुणांकडे बेकायदेशीर पिस्तूल आले कुठून, हा हल्ला नेमका का करण्यात आला आणि ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला त्याची पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करत होते.

गुन्हा दाखल

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह आर्म्स अॅक्ट, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये जीवघेणा हल्ला आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अशा गुंडांवर सणासुदीच्या काळात विशेष वॉच ठेवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, संशयित गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Posts

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

धाराशिवमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांना चोरीचा मोठा फटका; ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस, प्रकल्प वर्षभर लांबणीवर

धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये ८ महिन्यांत २० कोटींचे साहित्य चोरीस गेल्याने प्रकल्प एक वर्ष लांबले. चोरी आणि तोडफोडीमुळे…

ByByrushikesh Sep 24, 2026

फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल? दोन निवडणूक आयुक्तांनी घेतला आक्षेप, नवमतदारांना मनस्तापाची भीती

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये SIR शी संबंधित तीन प्रश्न जोडले; ऐच्छिक असूनही उत्तर दिल्याशिवाय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top