• Home
  • Crime
  • चुकून आरक्षित डब्यात चढल्याने तरुणाला रेल्वे पोलिसांची बेदम मारहाण; नातेवाइकांचे ‘रेल्वे रोको’
Image

चुकून आरक्षित डब्यात चढल्याने तरुणाला रेल्वे पोलिसांची बेदम मारहाण; नातेवाइकांचे ‘रेल्वे रोको’

नागपूरहून परतणाऱ्या तरुणाला वाशिमजवळ रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप; हिंगोली स्थानकावर प्रवाशांनी अडीच तास रेल्वे रोखून आंदोलन केल्यानंतर तक्रार दाखल

हिंगोली: धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आटोपून नागपूरहून परतणाऱ्या एका तरुणाला चुकून आरक्षित डब्यात चढल्याच्या कारणावरून रेल्वे पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी व स्थानिक नागरिकांनी हिंगोली रेल्वे स्थानकावर गुरुवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे सुमारे अडीच तास रेल्वे रोखून जोरदार आंदोलन केले. जखमी तरुणावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी असलेला सूरज हरिश्चंद्र वाहुळे हा आपल्या भावंडांसह धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर गेला होता. कार्यक्रम आटोपून ते सर्वजण २२ ऑक्टोबर रोजी भगत की कोठी-काचीगुडा एक्सप्रेस (ट्रेन क्र. १७६०६) ने परतीच्या प्रवासात होते.

पहाटे साधारणतः तीन वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन वाशिम रेल्वे स्थानकाजवळून जात असताना, गर्दीच्या गडबडीत सूरज वाहुळे चुकून बोगी क्रमांक एकच्या आरक्षित डब्यात चढला. आपली चूक लक्षात येताच त्याने ती बाब रेल्वे पोलिसांना सांगितली आणि चूकही मान्य केली. मात्र, रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचे काहीही ऐकून न घेता त्याच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर मध्ये पडलेल्या महिला प्रवाशांनाही धक्काबुक्की करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

प्रवाशांचा संताप अनावर; स्थानकावर आंदोलन

घटनेची माहिती मिळताच इतर डब्यांतील आंबेडकर अनुयायी व प्रवाशांनी आरक्षित डब्याकडे धाव घेतली आणि पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, जखमी सूरजचे नातेवाईक गौतम सरवदे यांनी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांना हिंगोली रेल्वे स्थानकावर मदत मिळेल असे सांगण्यात आले.

सकाळी सुमारे पाच वाजता ट्रेन हिंगोली रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी स्थानकावर उतरून रुळांवर धरणे आंदोलन सुरू केले आणि ट्रेनच्या इंजिनसमोर बसून रेल्वे रोखून धरली. ‘रेल्वे पोलिसांवर गुन्हे दाखल करा’ अशा घोषणा देत त्यांनी जोरदार निदर्शने केली.

पोलिसांचे आश्वासन; अडीच तासानंतर मार्गस्थ

या आंदोलनामुळे रेल्वेची वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास ठप्प झाली होती. अखेर हिंगोली शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांची तक्रार गांभीर्याने घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर सकाळी सुमारे साडेसात ते पावणेआठ वाजता ट्रेन आपल्या मार्गावर रवाना झाली.

या प्रकरणात जखमी सूरज वाहुळे यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, संबंधित रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे गवत कापत असताना ३८ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला; मुलाला रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या…

ByByrushikesh Nov 7, 2026

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top