MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आयोग अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा मागितला आहे. तसेच तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले असून, त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
आयोग अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप
विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भीमनवार यांची कारकीर्दच वादग्रस्त असल्याचे पवार म्हणाले. ते म्हणाले, “विवेक भीमनवार हे आधी RTO विभागात कार्यरत होते. तिथे त्यांनी केलेल्या कामकाजावरून अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. त्या विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार त्यांच्या कार्यकाळात झाला असल्याचे पुरावे आम्ही मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिले आहेत.”
“RTO मधील रॅकेट अजूनही सुरू”
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, भीमनवार हे अनेक वर्षे RTO मध्ये होते आणि त्यांनी तिथे उभे केलेले भ्रष्टाचाराचे रॅकेट अजूनही सुरू आहे. “आम्ही आतापर्यंत ४० टक्के पुरावे समोर आणले आहेत. हा लढा आम्ही लढणार आहोत आणि या माणसाचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.
तुकाराम मुंढे यांना अध्यक्षपदाची शिफारस
MPSC आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांनी एका नव्या नावाची शिफारस केली आहे. ते म्हणाले, “तुकाराम मुंढे यांना MPSC आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवले पाहिजे. मी सर्व अटी तपासल्या आहेत, त्यानुसार मुंढेसाहेब अध्यक्ष होऊ शकतात.” यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठीशी घालण्याचा आरोप
जर भीमनवार यांच्या विरोधात कारवाई नाही झाली, तर मुख्यमंत्रीच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. “भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही,” असे ते म्हणाले.
“हे आंदोलन माझे नाही”
आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत नसल्याचे स्पष्ट करत रोहित पवार म्हणाले, “हे आंदोलन माझे नाहीये. मी जसं जमेल तसं विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतोय. आंदोलन करायचे की नाही हे विद्यार्थ्यांनीच ठरवावे. जर विद्यार्थी म्हणाले तरच आपण आंदोलन करू.”
शेवटी, त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. “तुम्ही विरोधात असताना विद्यार्थ्यांसोबत असता आणि आता सत्तेत गेल्यावर गप्प बसता. तुमच्यात हिंमत नाही. तुमचा बॉस चुकत असेल तर त्याच्या विरोधात बोलायला हवे. विद्यार्थ्यांचे कल्याण करा,” असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.















