मुंबईत धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आरक्षणाची जोरदार मागणी. चर्चगेट स्टेशनला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी, वाचा संपूर्ण बातमी.
मुंबईत धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा, आरक्षणासह अनेक मागण्या
राज्यभरातून धनगर समाजाने आज मोठा आक्रोश मोर्चा काढला आहे. मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला असून आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी आपल्या मागण्या जोरदारपणे मांडल्या. आरक्षणाच्या प्रश्नासह चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
आरक्षणासाठी दोन्ही आघाड्यांवर लढत आहोत – गोपिचंद पडळकर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या मोर्चात आमदार गोपिचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळणे गरजेचे आहे. ते म्हणाले, “कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आम्ही दोन टप्प्यात लढत आहोत – एक रस्त्यावर आणि दुसरा विधानसभेत. तसेच न्यायालयीन लढाईही सुरू आहे.”
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात निराशा
पडळकर यांनी पुढे सांगितले की, उच्च न्यायालयात सरकारने धनगर समाजाला पाठिंबा दिला असला तरीही निकाल विरोधात गेला. त्यानंतर काही समाजबांधव सर्वोच्च न्यायालयात गेले, मात्र तेथेही मागणी फेटाळली गेली. आता समाजाने नव्याने मागणी केली असून सरकारला आपले मत मांडायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोक जाब विचारत आहेत, आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही
आमदार पडळकर यांनी सरकारला स्पष्ट इशारा देताना म्हटले की, “सरकारने न्यायालयातून किंवा स्वतःच्या माध्यमातून आरक्षण द्यावे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धनगरांची बाजू मांडावी. संवैधानिक प्रक्रिया करून आरक्षण द्या. आता लोक जाब विचारत आहेत, आंदोलन करत आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.”
चर्चगेट स्टेशनला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून चर्चगेट रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी पडळकर यांनी केली. ते म्हणाले, “अहिल्यादेवींचे काम देशभर आहे. त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केले. चर्चगेट स्थानकाबाहेर त्यांचे स्मारक आहे. त्यामुळे या स्थानकाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात यावे व मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारावे.”
वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने हायवे
आमदार पडळकर यांनी वीर शिंग्रोबा धनगर यांचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, “इंग्रजांच्या विरोधात अनेक लोक लढले, त्यापैकी एक वीर शिंग्रोबा धनगर होते. त्यांनी मुंबई कनेक्ट करण्यासाठी इंग्रजांना मदत केली. इंग्रजांनी त्यांना बक्षीस विचारले असता त्यांनी बक्षीस नाकारून ‘आमच्या देशातून निघून जा’ असे सांगितले. यामुळे इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. पण वीर शिंग्रोबा धनगर यांचा कधीच सन्मान झाला नाही. त्यामुळे पुणे-बंगळुरू हायवेला कनेक्टिंग लिंकला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली.














