वाहन नंबर प्लेटचा रंग काय सांगतो? पांढरी प्लेट खासगी, पिवळी व्यावसायिक, हिरवी इलेक्ट्रिक तर निळी राजनैतिक वाहनांची ओळख. जाणून घ्या प्रत्येक रंगाचा अर्थ.
रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेटा पाहिल्या असतील. कुठे पांढरी, कुठे पिवळी, तर काही ठिकाणी हिरवी किंवा निळी प्लेटही दिसते. पण हे रंग केवळ वाहनाला आकर्षक रूप देण्यासाठी नसतात; प्रत्येक रंगामागे एक विशिष्ट अर्थ आणि नियम असतो. भारतातील मोटार वाहन नियमांनुसार वाहनाचा प्रकार आणि त्याचा वापर यावरून नंबर प्लेटचा रंग ठरवला जातो. पुढच्या वेळी रस्त्यावर एखादे वाहन दिसल्यास त्याच्या नंबर प्लेटच्या रंगावरून तुम्ही ते वाहन खासगी आहे, व्यावसायिक आहे की इतर काही हे सहज ओळखू शकता.
पांढरी नंबर प्लेट म्हणजे खासगी वाहन
भारतात सर्वात जास्त दिसणारी नंबर प्लेट म्हणजे पांढऱ्या रंगाची प्लेट. पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगात अक्षरे आणि आकडे असलेली ही प्लेट कार, बाईक, स्कूटर आणि इतर खासगी वाहनांवर वापरली जाते. याचा अर्थ हे वाहन केवळ वैयक्तिक वापरासाठी आहे. अशा वाहनांमध्ये प्रवासी किंवा मालाची वाहतूक व्यावसायिक स्वरूपात करता येत नाही, तसेच ही वाहने भाड्यानेही देता येत नाहीत.
पिवळी नंबर प्लेट दिसली तर वाहन कमर्शियल
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट प्रामुख्याने व्यावसायिक वाहनांसाठी असते. पिवळ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगात नोंदणी क्रमांक असलेली ही प्लेट टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा, बस आणि मालवाहू वाहनांसारख्या व्यावसायिक वाहनांवर दिसते. म्हणजेच हे वाहन प्रवासी किंवा मालाच्या वाहतुकीसाठी व्यावसायिक स्वरूपात वापरले जात आहे, हे या प्लेटवरून स्पष्ट होते. केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार व्यावसायिक वाहनांसाठी पिवळ्या पार्श्वभूमीवर काळे अक्षर असलेली प्लेट अनिवार्य आहे.
हिरवी नंबर प्लेट म्हणजे इलेक्ट्रिक वाहन
हिरव्या रंगाची नंबर प्लेट इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरली जाते. खासगी इलेक्ट्रिक कार किंवा बाइकवर हिरव्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगातील अक्षरे आणि आकडे असतात. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठीही हिरव्या रंगाची प्लेट वापरली जाते, मात्र त्यावर पिवळ्या रंगात मजकूर असतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनाची वेगळी ओळख पटते आणि प्रदूषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन मिळते.
लाल नंबर प्लेटचा अर्थ काय?
लाल रंगाची नंबर प्लेट सामान्य वाहनांवर रोजच्या वापरात फारशी दिसत नाही. ही प्रामुख्याने तात्पुरत्या नोंदणीशी संबंधित असते. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक मिळण्यापूर्वी काही परिस्थितींमध्ये वाहनाला तात्पुरता नंबर दिला जातो आणि त्या काळात लाल प्लेट वापरली जाते. या प्लेटवर तात्पुरता नोंदणी क्रमांक असतो आणि तो ठराविक कालावधीसाठी वैध असतो. तसेच, काही विशेष सरकारी वाहनांवरही लाल प्लेट आढळते, ज्यावर भारताचे प्रतीक चिन्ह असते.
निळी नंबर प्लेट कुणाच्या वाहनावर असते?
निळी नंबर प्लेट प्रामुख्याने परदेशी दूतावास आणि राजनैतिक मिशनशी संबंधित वाहनांवर दिसते. या वाहनांच्या प्लेटवर सामान्य वाहनांप्रमाणे साधा रजिस्ट्रेशन नंबर नसून विशेष ओळख दर्शवणारे क्रमांक किंवा कोड असतात. निळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात असलेली ही प्लेट परराष्ट्र मंत्रालयाकडून दिली जाते. अशा वाहनांना काही विशेष सवलती आणि संरक्षण दिले जाते, तसेच स्थानिक कर आणि टोलमधूनही सूट दिली जाते.
नंबर प्लेटचा रंग का महत्त्वाचा?
वाहन नंबर प्लेटचा रंग केवळ ओळखण्यापुरता मर्यादित नाही. तो वाहनाचा प्रकार, त्याचा वापर आणि करप्रणाली याशीही जोडलेला असतो. व्यावसायिक वाहनांवर खासगी वाहनांपेक्षा जास्त कर आकारला जातो, त्यामुळे योग्य प्लेट वापरणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. तसेच हिरवी प्लेट असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना काही करांमध्ये सवलत मिळते आणि त्यांना वेगवेगळ्या धोरणांतर्गत प्रोत्साहन दिले जाते.
पुढच्या वेळी रस्त्यावरून जाताना आजूबाजूच्या वाहनांच्या नंबर प्लेटकडे नक्की पाहा. तुम्हाला त्यांच्याबद्दल एक वेगळीच माहिती कळेल आणि ते वाहन कशासाठी वापरले जाते, याचा अंदाज तुम्हाला येईल.















