समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात दरोडेखोरांची दहशत. खिळे टाकून ३ वाहनांचे टायर फोडले, १८ लाखांचा ऐवज लुटला. दिवसाढवळ्या उद्योजकाचा पाठलाग, गोळीबार. वाचा सविस्तर.
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; खिळे टाकून वाहनांचे टायर फोडले, १८ लाखांची लूट
नाशिक: समृद्धी महामार्गावर गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात (चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान) गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने भीषण थरार घडवून आणला. लुटारूंनी धावत्या वाहनांच्या रस्त्यावर खिळे व धारदार लोखंडी वस्तू टाकून टायर पंक्चर केले आणि लाखो रुपयांची लूटालूट केली. दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या घटनेत ३ वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या कुटुंबाला मारहाण, १८ लाखांचा ऐवज लांबवला
गुरुवारी मध्यरात्री १२:०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब कारने मुंबईच्या दिशेने जात होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे कारचे टायर फुटले. गाडी थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने वाहनाला चारी बाजूंनी वेढा घातला.
लुटारूंनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या भीषण दहशतीमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.
हवेत २ राऊंड फायर; व्यावसायिकाने कसा वाचवला जीव?
लुटारूंनी हिंगोलीच्या एका वाहनावर दगडफेक करून लूटमार केली. मात्र, एका वाहनचालकाने प्रसंगावधान राखून कारचा वेग वाढवल्याने तो बचावला.
त्यानंतर मध्यरात्री १.४० वाजेच्या सुमारास मुंबईहून नांदेडकडे परतणाऱ्या व्यावसायिकांच्या कारचे टायरही खिळे टाकून फोडण्यात आले. कार थांबताच हातात धारदार हत्यारे घेतलेले १२ ते १३ दरोडेखोर चालकाच्या दिशेने धावले. मात्र, चालकाने तातडीने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत २ राऊंड फायर केले. गोळीबाराच्या आवाजाने घाबरून लुटारूंनी महामार्गावरून खाली उड्या मारून पळ काढला.
दिवसाढवळ्या उद्योजकाचा ४ कि.मी. पाठलाग; अडीच तोळ्यांची साखळी हिसकावली
समृद्धी महामार्गावर केवळ रात्रीच नव्हे, तर भरदिवसाही दरोडेखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई कॉरिडॉरमधील एक्झिट क्र. १८ (हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ) गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
उत्तराखंड येथून देवदर्शन करून नाशिकच्या दिशेने ‘फॉर्च्यूनर’ कारने परतणाऱ्या अहिल्यानगर (राहुरी) येथील उद्योजक आणि त्यांच्या मित्रांचा तीन आलिशान गाड्यांनी (काळ्या रंगाची सेल्टॉस, पांढरी क्रेटा आणि काळी एक्सयुव्ही ७००) सुमारे ३ ते ४ किलोमीटर पाठलाग केला.
असा घडला थरार
दरोडेखोरांनी टोलनाक्याजवळ एसयूव्ही गाडी आडवी घालून “मागे काहीतरी झाले आहे, गाडी बाजूला घ्या” असा बनाव केला. गाडी थांबताच तिन्ही वाहनांमधून उतरलेल्या १० ते ११ जणांनी फॉर्च्यूनरला तिन्ही बाजूंनी घेरले. एका दरोडेखोराने उद्योजकाला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली.
मात्र, हा सर्व प्रकार कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तिन्ही गाड्यांमधून पोबारा केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वाहनांवर बनावट नंबरप्लेट वापरल्याचा संशय आहे. डॅश कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस तपास सुरू
समृद्धी महामार्गावर सलग घडत असलेल्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरोडेखोरांनी वापरलेल्या बनावट नंबरप्लेटमुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. मात्र, डॅश कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांना मोठा आधार ठरणार आहे. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















