• Home
  • Breaking News
  • खलाशाची डेड बॉडी परत आणली पण शरीरातून 21 अवयव गायब होते.
Image

खलाशाची डेड बॉडी परत आणली पण शरीरातून 21 अवयव गायब होते.

वेनेझुएलातून परत आलेल्या खलाशाच्या शरीरातून मेंदू, किडनी, फुफुस आणि महत्वाचे अवयव गायब!

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भलुआनी भागातलं लंगडा बाजार हे गाव, इथेच राहणारे तेहतीस वर्षांचे राकेश चौहान मर्चंट नेव्हीत खलाशी म्हणून काम करत होते. एक्सफिनिटी नावाच्या भारतीय एजन्सीच्या माध्यमातून राकेश नोव्हेंबर २०२५ मध्ये एका मालवाहू जहाजावर कामासाठी दक्षिण अमेरिकेतल्या वेनेझुएला या देशात गेले होते. घरात वृद्ध वडील, २०२३ साली झालेलं लग्न आणि अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा ऋत्विक असा राकेश यांचा परिवार होता. घरातला एकमेव कमावता माणूस म्हणून जबाबदारी पेलण्यासाठी राकेश परदेशी गेले होते.

कंपनीचा फोन आला आधी अपघात मग निधन झाल्याचे सांगितले.

मे महिन्याच्या सुरुवातीला अचानक कंपनीच्या मुंबई कार्यालयातून राकेश यांच्या कुटुंबाला फोन आला. सांगण्यात आलं की जहाजावर काम करताना राकेश यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्याच दिवशी कंपनीने कुटुंबाला कळवलं की राकेश वाचण्याची शक्यता फक्त पाच टक्के आहे आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्या मृत्यूची बातमी आली. मृत्यूचं कारण सांगितलं गेलं – हृदयविकाराचा झटका. शव एका आठवड्यात भारतात पाठवलं जाईल असं आश्वासन कंपनीने दिलं होतं पण प्रत्यक्षात महिनाभर काहीच हालचाल झाली नाही. राकेश यांचे वडील आणि पत्नी रंजना मुंबईच्या कार्यालयात जाऊन विचारणा करत राहिले तरीही ठोस उत्तर मिळत नव्हतं. अखेर ४ जून रोजी संध्याकाळी राकेश यांचा मृतदेह देवरियातल्या त्यांच्या घरी पोहोचला.

शवपेटी उघडली, आणि सर्वाना धक्का बसला.

शवपेटी घरासमोर आली तेव्हा गावभर गर्दी जमली होती. वडिलांचे हात थरथरत होते, पत्नी दुःखाने बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होती. पण खरा धक्का अजून बसायचा होता. मृतदेह पाहताच कुटुंबीयांना जाणवलं की यात काहीतरी गडबड आहे – कारण संपूर्ण शरीरावर मोठमोठे टाके घातलेले होते. वेनेझुएलाकडून ना पोस्टमार्टम अहवाल पाठवला गेला होता ना मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण स्पष्ट करणारा कोणताही कागद होता.

या संशयामुळे कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बरहज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पोस्टमार्टम पार पडलं.

डॉक्टरांच्या postmartm रिपोर्ट ने सत्य बाहेर आले.

आणि इथेच या प्रकरणाला खरं वळण मिळालं. पोस्टमार्टम अहवालातून जे समोर आलं ते ऐकून उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. राकेश यांच्या शरीरात मेंदू नव्हता, हृदय नव्हतं, दोन्ही फुप्फुसं गायब होती, यकृत आणि दोन्ही किडन्याही शरीरात सापडल्या नाहीत. याशिवाय प्लीहा, स्वादुपिंड, आतडे, थायरॉईड, स्वरयंत्र, श्वासनलिका, हायॉइड हाड असे एकूण २१ अवयव शरीरातून पूर्णपणे गायब असल्याचं डॉक्टरांनी नोंदवलं.

शरीरावर मानेपासून पोटापर्यंत २२ टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत २१ टाके आढळले. मृतदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीजरमध्ये ठेवला गेला होता त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण ठरवणंही डॉक्टरांना कठीण झालं. सामान्यपणे पोस्टमार्टमदरम्यान तपासणीसाठी काही नमुने घेतले जातात हे खरं असलं तरी या प्रकरणात संपूर्ण शरीरातले महत्त्वाचे अवयवच शिल्लक नसणं हे कोणत्याही सर्वसामान्य प्रक्रियेत बसत नाही.

संघटनांचा निषेध, कुटुंबाची न्यायाची मागणी

भारतीय खलाशांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ सीफेरर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) या संस्थेने हे प्रकरण अत्यंत गंभीर मानवाधिकार उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणताही वैद्यकीय अहवाल न देता शव पाठवणं पूर्णपणे अस्वीकार्य आहे. कागदपत्रांमध्येही अनेक विसंगती आढळल्याचा दावा संघटनेने केला आहे. FSUI ने भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि वेनेझुएलातील भारतीय दूतावासाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. भारतीय दूतावासानेही वेनेझुएला सरकारकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राकेश यांचे वडील रामदेव चौहान म्हणतात की कंपनीने त्यांना सुरुवातीपासूनच अंधारात ठेवलं. आधी अपघाताची बातमी, मग जगण्याची कमी शक्यता आणि शेवटी अचानक मृत्यूची बातमी – असं सगळं इतक्या घाईत सांगितलं गेलं की काहीच स्पष्ट होत नव्हतं. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार परदेशात एखाद्या नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यास संबंधित देशाने संपूर्ण वैद्यकीय अहवाल दूतावासाला देणं बंधनकारक असतं पण राकेश यांच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. पत्नी रंजना चौहान यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय जलपरिवहन मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला ईमेल पाठवून न्यायाची मागणी केली आहे. गावातले लोकही या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत.

वेनेझुएलामध्येच झाली गडबड.

वेनेझुएला हा देश दक्षिण अमेरिकेतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या भागात येतो. अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुप्रसिद्ध मार्गाचा हा भाग मानला जातो, जिथून दरवर्षी हजारो लोक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. याच भागात अमली पदार्थांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचं वारंवार समोर आलं आहे आणि परदेशी नागरिकांचं अपहरण करून त्यांची लूट केल्याच्या घटनाही या भागात नोंदवल्या गेल्या आहेत.

राकेश यांच्यासोबत नेमकं काय घडलं? ते खरंच अपघातात मृत्युमुखी पडले की एखाद्या मोठ्या अवयव चोरीच्या रॅकेटचे बळी ठरले? हे अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र शरीरातून पूर्णपणे गायब झालेले अवयव अनेक प्रश्न निर्माण करतात. वेनेझुएलातील पोस्टमार्टम अहवाल आणि भारतातील अहवाल यांच्यातील विरोधाभासही चिंतेची बाब आहे.

आता या प्रकरणाचे पुढे काय?

आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का? आणि राकेश यांच्या कुटुंबाला खरा न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एका सामान्य कुटुंबाचा आधार असलेला तरुण दोन पैसे कमावण्यासाठी परदेशी गेला आणि परत आला तो फक्त एक रिकामा देह घेऊन.

तुम्हाला काय वाटतं, राकेश चौहान यांच्यासोबत वेनेझुएलात नेमकं काय घडलं असावं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

Related Posts

साखरेचे दर गगनाला, पण शेतकऱ्यांच्या हाती काय? ४ हजार रुपयांच्या मागणीसाठी आंदोलन पेटले

दुष्काळात ऊस उत्पादकांचा संघर्ष; ४ हजार रुपये दरासाठी शेतकरी आक्रमक, कारखान्यांवर दबाव मराठवाडा अपडेट २४ | विश्वासार्ह •…

ByByrushikesh Sep 25, 2026

१८ वर्षीय तरुणीला पाठवले अश्लील फोटो, शरीरसुखाची मागणी; ‘शौर्य’ पदकप्राप्त पोलिसावर तीन वर्षांनी गुन्हा

गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी एका १८ वर्षीय तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल…

ByByrushikesh Sep 25, 2026

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वाजवायचा असेल तर मंडळांना जमा करावे लागणार 1 लाख रुपये

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! लाऊडस्पीकर वापरण्यासाठी मंडळांना 1 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार मुंबई: गणेशोत्सवासह सर्व…

ByByrushikesh Sep 24, 2026

‘नो युपीआय डे’: 2 ऑक्टोबरला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकणार; महाराष्ट्रासह देशभरातील 500 हून अधिक व्यापारी संघटना आंदोलनात

एमडीआर शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांचे आंदोलन; गांधी जयंतीला क्यूआर कोड काळ्या कापडाने झाकून ‘गांधीगिरी’चा मार्ग मुंबई: युपीआय…

ByByrushikesh Sep 24, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top