गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांपूर्वी एका १८ वर्षीय तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली होती. या प्रकरणात तब्बल तीन वर्षांनंतर तरुणीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून पुनर्प्राप्त झाल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘शौर्य’ पदकप्राप्त पोलिस कर्मचारी ओमप्रकाश मनोहर जामनिक (वय ४४, सध्या रा. अकोला) आणि तरुणीचा प्रियकर विकेश वसंत अंबादे (वय २४, रा. चिपोटा, ता. देवरी) यांच्याविरुद्ध चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिया शैलेषकुमार ताम्रकार (वय १८, रा. ककोडी, ता. देवरी) हिने ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता सुमारास राहत्या घरी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. तिचा विकेश अंबादे याच्यासोबत प्रेमसंबंध होता. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे व्हॉट्सॲप संभाषणातून समोर आले होते.
घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तरुणीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी तो न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. प्रयोगशाळेकडून डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट आणि मेसेज परत मिळताच तपासाला नवे वळण मिळाले.
डिलीटेड चॅटमधून समोर आले धक्कादायक तथ्य
न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पोलिसांनी व्हॉट्सॲप चॅटची पंचांसमक्ष तपासणी केली. त्यातून समोर आले की, त्यावेळी देवरी येथील नक्षल गोपनीय शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी ओमप्रकाश जामनिक याने तरुणीला स्वतःचे अश्लील छायाचित्र पाठवले होते आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणारे संदेश केले होते.
या प्रकारामुळे पिया आणि तिचा प्रियकर विकेश यांच्यात वारंवार तीव्र वाद होत होते. या त्रासाला कंटाळूनच पियाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेच्या आदल्या दिवशी पियाने विकेशला वारंवार फोन केले होते. त्यापैकी १६ कॉल त्याने कट केले, तर १२ कॉलला प्रतिसाद दिला होता, असेही तपासात समोर आले आहे.
पोलिस कर्मचाऱ्याची विनंती बदली
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ओमप्रकाश जामनिक याने प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून अकोला येथे बदलीची विनंती केली होती. विभागाने ती विनंती मान्य केली होती. सध्या जामनिक हा अकोला येथे राहत आहे.
गुन्हा दाखल, अटक अद्याप नाही
तरुणीच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली होती. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारी अभियोक्त्यांकडून अभिप्राय घेण्यात आला होता.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या तक्रारीवरून विकेश अंबादे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६ अन्वये, तर जामनिक याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ), ५०९ अन्वये गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.
मात्र, अद्याप दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.















