धाराशिवच्या प्रथमेश देशमुखने पुण्यातील भाड्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. एमपीएससीच्या सातत्यपूर्ण अपयशाने आणि अडीच लाखांच्या कर्जाच्या तणावाने त्याला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले.
पुणे: स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या एका तरुणाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील राहिवासी असलेल्या प्रथमेश देशमुख (वय २८) या उच्चशिक्षित तरुणाने पुण्यातील शनिवार पेठेतील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Pune MPSC Student Death) धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत ‘लढू आणि जिंकू’ असा नारा देत निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रथमेशच्या अचानक झालेल्या या एक्झिटमुळे मित्रपरिवार आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा तपशील आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
मूळचा खासापुरी (तालुका परंडा, जिल्हा धाराशिव) येथील रहिवासी असलेला प्रथमेश गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता आणि एमपीएससीची (MPSC) तयारी करत होता. गेल्या आठ महिन्यांपासून तो शनिवार पेठेतील नंदन सोसायटीमध्ये भाड्याने राहत होता. मंगळवारी रात्री ११ वाजता तो खोलीवर परतला होता. मात्र, बुधवारी सकाळी तो बेडरूममधील छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रथमेशच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून घरी त्याची आई एकटीच राहते, तसेच त्याला चार विवाहित बहिणी आहेत. घरची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने आलेले अपयश यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता.
कर्जाचा डोंगर आणि नैराश्याचे कारण
या घटनेमागील मूळ कारण शोधताना पोलिसांना प्रथमेशच्या खोलीतून महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. घटनास्थळी कोणतीही ‘सुसाईड नोट’ आढळलेली नसली, तरी दोन पानांवर त्याने लिहिलेला जमा-खर्चाचा आणि कर्जाचा हिशोब पोलिसांच्या हाती लागला आहे. या कागदावर त्याने सुमारे १८ ते १९ जणांकडून घेतलेल्या तब्बल अडीच लाख रुपयांच्या कर्जाची नोंद केली होती.
विशेष म्हणजे, ज्यांचे पैसे त्याने परत केले होते, त्यांच्या नावापुढे त्याने ‘टिक मार्क’ करून ठेवला होता. यावरून कर्जाचा वाढत चाललेला तगादा आणि आर्थिक विवंचनेतून आलेल्या मानसिक तणावामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांचे प्राथमिक निष्कर्ष
या प्रकरणी माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रथमेश मागील काही वर्षांपासून शनिवार पेठ परिसरात राहून एमपीएससीचा अभ्यास करत होता. परीक्षांमध्ये वारंवार आलेले अपयश आणि कर्जाचा मोठा ताण या मानसिक दडपणाखाली (Stress) त्याने आत्महत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन (Medical) पूर्ण झाले असून मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला आहे.”
प्रथमेशच्या आत्महत्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये खळबळ
प्रथमेशच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. केवळ काही दिवसांपूर्वीच तो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाला होता आणि त्याने ‘लढू आणि जिंकू’ अशी भावना व्यक्त केली होती. त्यामुळेच त्याच्या या अचानक पावलामुळे सर्वजण स्तब्ध झाले आहेत. आर्थिक ताण आणि मानसिक आरोग्य यावर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये अधिक चर्चा होण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
आर्थिक ताण आणि मानसिक आरोग्याचा संबंध
तज्ञांच्या मते, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक अस्थिरता आणि कर्ज हे मोठे मानसिक आव्हान असते. प्रथमेशच्या केसमध्येही अडीच लाखांचे कर्ज आणि परीक्षेतील अपयश यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच मदत घेणे आवश्यक आहे.















