पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे 19 वर्षीय पुतण्याने चुलत्याच्या घरातील 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून विकले आणि त्यातून थार कार खरेदी केली. कारच्या पूजनासाठी ज्यांच्याकडून चोरी केली त्यांनाच बोलावल्याने प्रकरण उघडकीस आले.
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 19 वर्षीय पुतण्याने आपल्या चुलत्याच्या घरातील तिजोरीतून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले आणि त्या पैशांतून 10 लाख रुपये किमतीची महिंद्रा ‘थार’ कार खरेदी केली. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी संशयित पुतण्या आणि त्याच्याकडून सोने खरेदी करणाऱ्या सोनाराला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे समर पोपट चव्हाण (वय 19) आपल्या कुटुंबियांसह राहतो. त्याच्याजवळच त्याचे चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण हे आपल्या कुटुंबासह राहतात. सुमारे एक महिन्यापूर्वी समरने उमेश चव्हाण यांच्या घरातील तिजोरीतून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले आणि गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे यांच्याकडे ते दहा लाख रुपयांना विकले.
कारच्या पूजनाने फुटला भोपळा
चोरीच्या पैशांतून समरने दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील शिरोली येथील एका शोरूममधून नवीन थार कार खरेदी केली. नवीन कार घरी आणल्यानंतर त्याने कारच्या पूजनासाठी आपले चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावले. पूजेला जाण्यापूर्वी दागिने घालण्यासाठी उमेश चव्हाण यांच्या पत्नीने तिजोरी उघडली असता, त्यातील दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे आढळून आले.
फक्त चुलत्याचेच दागिने का गायब?
तिजोरीत एक आश्चर्याची बाब घडली होती. तिथे बाजूला असलेले आजीचे दागिने मात्र चोरीला गेले नव्हते. फक्त उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिनेच चोरीला गेले होते. यावरून चोर हा जवळचाच किंवा घरचाच असावा अशी शंका उमेश चव्हाण यांना आली. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांची चौकशी आणि अटक
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. उमेश चव्हाण यांचा पुतण्या समर याने अचानक नवीन कार कोठून खरेदी केली आणि त्यासाठी पैसे कोठून आले, याची चौकशी केली असता समरनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रत्यक्षात चोरी करणारा समर चव्हाण आणि त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम मोरे या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

















