मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघणार. २० सप्टेंबरला आझाद मैदान, मुंबईत मुक्काम. संपूर्ण मार्ग, आचारसंहिता आणि आवाहन.
मराठा आंदोलनाची मुंबईकडे वाटचाल: २० सप्टेंबरला आझाद मैदानात मोर्चा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे मोर्चा नेण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून सुरू होणारा हा मराठा मोर्चा २० सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा मोर्चा मुंबईत दाखल होणार असल्याने पोलीस यंत्रणेसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मोर्चाचा संपूर्ण प्रवासमार्ग
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा संपूर्ण मार्ग आणि मुक्कामांची यादी जाहीर केली आहे. दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर कापत हा मोर्चा पुढे सरकणार आहे.
- १५ सप्टेंबर: अंतरवाली सराटी येथून प्रस्थान
- १६ सप्टेंबर: पहिला मुक्काम – पाटोदा, बीड जिल्हा
- १७ सप्टेंबर: दुसरा मुक्काम – श्रीगोंदा, अहिल्यानगर जिल्हा
- १८ सप्टेंबर: तिसरा मुक्काम – हडपसर, पुणे
- १९ सप्टेंबर: चौथा मुक्काम – खोपोली, रायगड जिल्हा
- २० सप्टेंबर: पाचवा मुक्काम – आझाद मैदान, मुंबई
जरांगे यांनी सांगितले की, खोपोलीनंतर कदाचित कोपरखैरणे येथेही मुक्काम केला जाऊ शकतो. त्यानंतर अंतिम टप्पा आझाद मैदानात असेल.
शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना कडक आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना केली आहे. मुंबईत आरक्षण परत मिळेपर्यंत शांततेचे आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“दगडफेक कोणी करायची नाही, जाळपोळ कोणी करायची नाही. वाहने शांतपणे चालवायची आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपला हक्क मिळवायचा आहे.”
अशा शब्दांत जरांगे यांनी आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
श्रीमंत मराठ्यांना वाहनांचे आवाहन
जरांगे यांनी श्रीमंत मराठा बांधवांना मोर्चासाठी वाहने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांनी आंदोलकांना मुंबईच्या वेशीपर्यंत सोडावे आणि नंतर परत जावे, असे त्यांनी सांगितले.
“तुमची गाडी घरी उभी राहील, ती फक्त मुंबईपर्यंत पाठवा. चार दिवस डिझेल भरून द्या. तुमचे फक्त डिझेल जाईल, पण त्यामुळे मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचे सोने होईल.”
स्थानिकांना आशीर्वाद देण्याचे आवाहन
ज्या जिल्ह्यांतून मोर्चा जाईल, त्या भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आशीर्वाद देऊन घरी जावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. नोकरदार, व्यावसायिक, राजकारणी आणि गरीब शेतकरी यांना मुंबईला येणे शक्य होणार नाही, त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर यावे, असे ते म्हणाले.
पोलिसांसमोर आव्हान
गणेशोत्सवाच्या काळात २० सप्टेंबरला मोर्चा मुंबईत पोहोचणार असल्याने पोलीस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मोर्चाच्या मार्गावर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.















