छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा यात्रेत तोतया पोलीस म्हणून बंदोबस्तात सहभागी झालेल्या आम्रपाली नरवाडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. नेमप्लेटमधील त्रुटी आणि चुकीच्या पद्धतीने लावलेल्या लाइनयार्डमुळे संशय आल्याने तिचा बनावटीचा पर्दाफाश झाला.
छत्रपती संभाजीनगर: नवरात्रोत्सवानिमित्त भरलेल्या कर्णपुरा यात्रेत बनावट पोलीस वर्दी परिधान करून बंदोबस्तात सहभागी झालेल्या एका 21 वर्षीय तरुणीला छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आम्रपाली रमेश नरवाडे (रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने स्वतःला नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कान्स्टेबल असल्याचे भासवले होते. मात्र, तिच्या नेमप्लेटमधील त्रुटी आणि चुकीच्या पद्धतीने लावलेल्या लाइनयार्डमुळे पोलिसांना संशय आला आणि तिचा बनावटीचा पर्दाफाश झाला.
नेमकं काय घडलं?
घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी सुमारे 7 वाजता घडली. कर्णपुरा यात्रेतील मारुती मंदिराजवळ छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस वर्दीमधील एक तरुणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. महिला पोलीस कर्मचारी मीना जाधव आणि इतरांनी तिला थांबवून चौकशी केली असता, तिने स्वतःला नाशिक ग्रामीण पोलीस दलात नुकतीच भरती झाल्याचे आणि गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू असल्याचे सांगितले.
मात्र, पोलिसांनी तिच्याकडे ओळखपत्र आणि नियुक्तीचे पत्र मागितले असता ती ते सादर करू शकली नाही. तसेच तिने यात्रेत विशेष सुरक्षा कर्तव्यावर असल्याचा दावाही केला होता. तिचे वागणे संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन छावणी पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांना काय आढळले?
चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आम्रपालीने आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना तीन वर्षांपूर्वीच पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्याची खोटी माहिती दिली होती. ती सध्या आपल्या मामाकडे राहण्यासाठी शहरात आली होती आणि त्यांना यात्रेत सुरक्षा ड्युटीवर असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता, त्यात पोलीस गणवेशातील अनेक इन्स्टाग्राम रील्स आढळून आल्या. पोलिसांना असेही समजले की, तिने जाधववाडी येथे काही दिवस पोलीस प्रशिक्षण घेतले होते. पोलीस गणवेशाची आवड आणि सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात तिने हा प्रकार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
गुन्हा दाखल
या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार मीना नागनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात आम्रपाली नरवाडे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 205 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या तिने हा गणवेश कुठून आणला, याचा तपास करत आहेत.
याआधीही घडला होता असाच प्रकार
हे प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या वर्षी कर्णपुरा यात्रेत घडलेल्या एका समांतर घटनेची आठवण झाली. 24 सप्टेंबर 2025 रोजी याच यात्रेत लहु राऊत (रा. सोमवाडी, ता. पैठण) या तरुणाला भारतीय सैन्याच्या गणवेशात फिरताना पकडण्यात आले होते. त्याने स्वतःला उत्तराखंडमधील 37व्या बटालियनमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले होते, परंतु ओळखपत्र मागितल्यावर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.















