राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांचा जीममधील वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. काव्यात्मक कॅप्शनमधून राजकीय पुनरागमनाचे संकेत? वाचा सविस्तर.
धनंजय मुंडे यांचा व्हिडीओ चर्चेत
गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ते जीममध्ये कसरत करताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त असल्याने धनंजय मुंडे सध्या स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते जीममध्ये जाऊन घाम गाळत आहेत.
या व्हिडीओमुळे धनंजय मुंडे यांच्यात कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. यापूर्वीही ते फिट राहण्याकडे भर देत होते; मात्र, त्यांचा हा नवा लूक त्यापेक्षाही चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये त्यांची पिळदार शरीरयष्टी आणि आर्म्स, लेग्ससह सर्व व्यायाम करतानाची झालेली तयारी स्पष्टपणे दिसून येते.
‘काटे खोलवर रुतले…’ काव्यातून काय संदेश?
धनंजय मुंडे यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत.
“काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…”
या काव्यात्मक ओळींमधून धनंजय मुंडे यांनी संघर्ष, टीका, अडचणी आणि त्यातून पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “निंदा-दूषणे आता न भिडती” या ओळीतून त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : मंत्रिपदाचा राजीनामा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची २०२४ साली विधानसभा निवडणुकीनंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. यावरून धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका झाली होती आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती.
यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावे यासाठी अनेकदा चर्चा झाल्या होत्या; मात्र, या चर्चा कधीच प्रत्यक्षात आल्या नाहीत. अलीकडेच त्यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी परळीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालंय. पण येणारा काळ आपलाच आहे आणि चमत्कार दाखवावा लागेलच” असे सूचक भाष्य केले होते.
सुनेत्रा पवार प्रकरणाने वाढलेले वाद
अलीकडेच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना, धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलू न देता स्वतः पत्रकारांना त्या बोलणार नाहीत, असे सांगितल्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे कान टोचले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय पुनरागमन आणखीनच लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.
राजकीय पुनरागमनाची शक्यता किती?
गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांमुळे प्रचंड वादात अडकले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणे, यामुळे त्यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठे संकट आले होते. बऱ्याच काळानंतर सक्रिय झालेल्या धनंजय मुंडे यांनी ही पोस्ट टाकून आपण सर्व आरोप, टीका आणि अडचणींनंतरही खचलेलो नाही, तर लढत राहणार असल्याचा संदेश दिला आहे.
त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, आगामी काळात धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सुनेत्रा पवार प्रकरणानंतर झालेल्या वादामुळे त्यांचा हा प्रवास आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.















