• Home
  • Breaking News
  • नवरात्रीच्या नावाखाली माणुसकीचा बळी! नऊ महिन्यांच्या मृत बाळाला आई-वडिलांचा शेवटचा स्पर्शही नाकारला; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
Image

नवरात्रीच्या नावाखाली माणुसकीचा बळी! नऊ महिन्यांच्या मृत बाळाला आई-वडिलांचा शेवटचा स्पर्शही नाकारला; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात जन्मानंतर काही तासांतच नवजात बाळाचा मृत्यू झाला; मात्र नवरात्र आणि धार्मिक कारण देत आई-वडिलांनी मृत बाळाला हात लावण्यास नकार दिला. अखेर स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनीच बाळावर मायेचा हात फिरवत अंत्यसंस्कार केले.

छत्रपती संभाजीनगर: नवरात्रीचा उत्सव आणि देवीच्या मातृत्वाची आराधना सुरू असताना, शहरात एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने सर्वांना हेलावून टाकले आहे. गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात ३६ वर्षीय महिलेने सोमवारी रात्री बाळाला जन्म दिला. मात्र बाळंतपणातील गुंतागुंत वाढल्याने मंगळवारी सकाळी नवजात अर्भकाने जगाचा निरोप घेतला. नऊ महिने पोटात वाढवलेल्या या बाळाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी नवरात्र आणि धार्मिक कारण देत मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही नकार दिला. अखेर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच या चिमुकल्याला मायेने कुशीत घेत अखेरचा निरोप दिला.

नेमकं काय घडलं?

मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले आणि कामानिमित्त गेल्या वर्षभरापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे हे जोडपे. घरात बाळ येणार असल्याने कुटुंब आनंदात होते. गजानन महाराज मंदिर परिसरातील खासगी रुग्णालयात महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. सोमवारी रात्री तिने बाळाला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काही वेळातच नवजात अर्भकाने अखेरचा श्वास घेतला.

या अनपेक्षित घटनेने जोडपे कोलमडून जाणे अपेक्षित होते. पण वास्तवाने धक्कादायक वळण घेतले. नवरात्र सुरू असल्याच्या कारणावरून आई-वडिलांनी आपल्या मृत बाळाला हात लावण्यास नकार दिला. “आमच्यामध्ये बाळ आणि बाळंतिणीला हात लावत नाहीत, त्यामुळे आम्ही कोणतेही विधी करू शकत नाही,” असे सांगत वडिलांनी सेंट्रल नाका स्मशानभूमीशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांनाच बाळाला नेण्यासाठी बोलावले.

स्मशानभूमी कर्मचाऱ्यांची माणुसकी

सेंट्रल नाका स्मशानभूमीचे कर्मचारी देवराज गायकवाड आणि रामेश्वर साबळे यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर एक विचित्र दृश्य पाहिले — आई-वडिलांमध्ये कोणतेही दुःख दिसत नव्हते. दोघांनी स्वतः बाळाचा मृतदेह हातात घेतला आणि मोटारसायकलवरून स्मशानभूमीकडे निघाले. वडिलांनी त्यांच्यासोबत बसण्यास नकार दिला आणि ते रिक्षाने मागे आले.

स्मशानभूमीत पोहोचल्यावर वडिलांनी पावतीची औपचारिकता पूर्ण केली. देवराज आणि रामेश्वर यांनी स्वतः खड्डा खोदून बाळाचे संपूर्ण दफन केले. या संपूर्ण प्रक्रियेत वडील बाजूला उभे होते — कोणतेही अश्रू नाही, कोणतेही दुःख नाही. दफन झाल्यानंतर वडिलांनी थोडे दूध बाळाच्या थडग्यावर शिंपडले आणि तिथून निघून गेले. मात्र, शेकडो मृतदेहांचे अंत्यसंस्कार पाहिलेल्या या कर्मचाऱ्यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले.

धार्मिक श्रद्धा की माणुसकी?

नवरात्रीत देवीच्या मातृत्वाची आराधना सुरू असतानाच जन्मदात्यांनी पोटच्या बाळाला परके केल्याची ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मदात्यांनीच परके केलं आणि स्मशानभूमीत काम करणाऱ्या अनोळखी हातांनीच मायेनं कुशीत घेत बाळाला अखेरचा निरोप दिला.

या घटनेने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. देव-धर्माच्या श्रद्धेपुढे माणुसकी हरली का? एका निष्पाप जीवाच्या अखेरच्या प्रवासातही आई-वडिलांची माया मिळू शकली नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा ठरतोय.

Related Posts

नंदुरबार सामूहिक बलात्कार प्रकरण: पुराव्यांच्या त्रुटींमुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष मुक्त

पीडितेच्या साक्षीतील विसंगती, वैद्यकीय अहवालातील त्रुटी आणि डीएनए पुराव्याची अखंडता सिद्ध न झाल्याने न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द…

ByByrushikesh Nov 7, 2026

व्हिडिओकॉनचं २० हजार कोटींचं साम्राज्य कोसळलं; वेणुगोपाल धूत अधिकृतपणे दिवाळखोर घोषित

छ. संभाजीनगर : एकेकाळी भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांचा भाग असलेला आणि ‘प्रत्येक घराची पसंती’ म्हणून ओळखला जाणारा व्हिडिओकॉन…

ByByrushikesh Nov 6, 2026

नाथसागरात ७०% पाणीसाठा, तरीही विदेशी पक्षी आले नाही ?

नाथसागरात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असूनही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन उशिराने; अल निनोसह सांडपाणी, रासायनिक खते आणि मासेमारीमुळे पक्ष्यांच्या…

ByByrushikesh Nov 5, 2026

थंडीचं कनेक्शन तुटलं! उत्तरेकडून कोरडे वारे सुरू, पण मराठवाड्यात थंडी कधी?

मराठवाड्यात थंडीची प्रतीक्षा लांबणार. उत्तरेकडून कोरडे वारे सुरू; ९ नोव्हेंबरनंतर तापमान घटणार, पण एल निनोमुळे डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर…

ByByrushikesh Nov 5, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top