दुष्काळाच्या परिस्थितीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. 18 जिल्ह्यांत कमी पाऊस, शेतकऱ्यांसाठी मदतीचे आश्वासन आणि गणेशोत्सवात आंदोलन न करण्याचे आवाहन.
नागपूर: राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे पाटील काय करत आहेत यापेक्षा दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तसेच दुष्काळ निवारणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
१८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट
महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे पिके करपत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती देत, आज पुन्हा सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दुष्काळात कशी मदत करता येईल आणि त्यांना आत्महत्येपासून कसे रोखता येईल, यावर सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या असून, कॅबिनेटमध्येही याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील आंदोलनांवर सरकारची भूमिका
मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलकांना त्यांनी विनंती केली की, गणेशोत्सवासारख्या मंगल काळात मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.
“ओबीसी किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात कधी न घेतलेले निर्णय या दोन्ही नेत्यांनी घेतले आहेत. तरीही त्यांच्यावर टीका केली जात आहे, जे महाराष्ट्राला पटत नाही,” असे बावनकुळे यांनी नमूद केले.
सरकारला थोडा वेळ द्या – बावनकुळे
मराठा समाजाला आजवर मिळालेला न्याय हा फडणवीस आणि शिंदे यांच्या काळातच मिळाला आहे. आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत असल्याने सरकारला थोडा वेळ दिला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, गणेश उत्सव हा देशातील सर्वात मोठा सण असून या काळात कोणीही आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकरी मदतीसाठी प्रशासन सज्ज
राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाला आणि मुख्य सचिवांना तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी नियमावलीच्या आधारे मदत केली जाईल. राज्याची पूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ती मांडली जाईल.
या मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि यंत्रणा दौरा करणार असून स्वतः बावनकुळे देखील काही ठिकाणी भेट देणार आहेत.















