कलीम कुरेशी या आरोपीचा सूत्रधारत्वाचा खुलासा झाला असून ४ जिवंत गोवंश व २५० किलो मांसासह एकाला अटक.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गोमांस तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. आधीच शासनाच्या धान्याचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणात ‘मोक्का’च्या गुन्ह्यात असलेला कलीम कुरेशी हा गोमांस तस्करी रॅकेटचाही सूत्रधार असल्याचे आता समोर आले आहे. सिल्लेखाना भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ जिवंत गोवंश व २५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.
क्रांतीचौक पोलिसांनी केली कारवाई
क्रांतीचौक पोलिसांना सिल्लेखाना परिसरात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची माहिती सोमवारी (२९ जून) सकाळी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा मस्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाडसी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी जाताच कत्तलीच्या तयारीत असलेल्या आरोपींमध्ये पळापळ सुरू झाली.
मात्र, पोलिसांनी परिसराला वेढा घालत शफीक शरीफ कुरेशी (रा. समतानगर) याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे साथीदार समीर ऊर्फ भुऱ्या कुरेशी आणि अनिस हनिफ कुरेशी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या ठिकाणावरून ४ जिवंत गोवंश तसेच सुमारे २५० किलो गोमांस हस्तगत करण्यात आले.
शहरातील विविध मोठ्या हॉटेल्स, लग्नसमारंभाच्या मॅरेज हॉल्स तसेच मांस विक्रेत्यांना पुरवले जात होते.
अटक केलेल्या शफीक कुरेशीने पोलीस चौकशीत सनसनाटी माहिती उघड केली. त्याने सांगितले की, कलीम छोटू कुरेशी, शेख अजहर शेख चांद कुरेशी, अबरार जब्बार कुरेशी, समीर ऊर्फ भुऱ्या कुरेशी आणि जफर मुख्तार कुरेशी हे बाहेरून गोवंशांची तस्करी करतात. कत्तलीनंतर हे मांस कलीम कुरेशी आणि त्याच्या साथीदारांमार्फत शहरातील विविध मोठ्या हॉटेल्स, लग्नसमारंभाच्या मॅरेज हॉल्स तसेच मांस विक्रेत्यांना पुरवले जाते.
कलीम कुरेशीवरील गंभीर आरोप
उल्लेखनीय बाब म्हणजे, कलीम कुरेशी यापूर्वीही शासनाच्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी शहर पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्या टोळीला यापूर्वीच ‘मोक्का’ (महाराष्ट्र संगठित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गोमांस तस्करी प्रकरणातही त्याची सक्रियता समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कारवाईत सहभागी पोलीस कर्मचारी
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अंमलदार शरद देशमुख, महादेव खिरोडकर, पद्मसिंह कोळेकर, नितीन नागरे आणि पंकज बुंदे यांनी केली. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.















