छत्रपती संभाजीनगरच्या अमरप्रीत हॉटेलवर FDA ची कारवाई. तपासणीत स्वयंपाकघरात सांडपाणी, सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस व विनालेबल मार्जरीन आढळल्याने परवाना निलंबित.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध आणि तारांकित हॉटेल म्हणून ओळख असलेल्या ‘हॉटेल अमरप्रीत’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या या तपासणीत हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी घातक खेळ करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे एफडीएने हॉटेलचा FSSAI (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण) परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
एफडीएची धडक तपासणी; काय आढळले?
एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथकाने सोमवारी उशिरापर्यंत हॉटेलची पाहणी केली. यावेळी हॉटेलच्या चिलिंग सेंटर आणि स्टोअर रूममध्ये तपासणी करताच अधिकाऱ्यांना भयानक दृश्य पाहायला मिळाले.
तपासणीत काकडी, ढोबळी मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी यांसारख्या सडलेल्या व कुजलेल्या भाज्यांचा मोठा साठा आढळून आला. तसेच अत्यंत खराब झालेले आणि मुदतबाह्य मशरूमही साठवून ठेवण्यात आले होते. ग्राहकांना पिझ्झा बनवून देण्यासाठी वापरला जाणारा ‘पिझ्झा बेस’ देखील पूर्णपणे मुदतबाह्य झाला होता.
‘बटर’च्या नावाखाली धोकादायक ‘ट्रान्स फॅट’?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलमध्ये विनालेबल मार्गारीनचा मोठा साठा सापडला. हॉटेलच्या मेनू कार्डवर ‘बटर चिकन’, ‘बटर तंदुरी रोटी’ आणि विविध ग्रेव्हींमध्ये अस्सल लोणी (बटर) वापरल्याचा उल्लेख असताना, प्रत्यक्षात त्याऐवजी विनालेबल मार्गारीनचा वापर केला जात असल्याचा दाट संशय आहे.
विशेष म्हणजे, मार्गारीनमध्ये अतिशय घातक मानले जाणारे ‘ट्रान्स फॅट’ असते, ज्यामुळे मानवी शरीरात थेट हृदयविकाराचा धोका प्रचंड प्रमाणात वाढतो. ही ग्राहकांची उघड फसवणूक आणि दिशाभूल करणारी बाब मानली गेली आहे.
स्वयंपाकघरात सांडपाणी आणि अस्वच्छता
तपासणीत हॉटेलच्या स्वयंपाकघरात सांडपाणी साचलेले आढळले. कचऱ्याचे डबेही उघडे ठेवण्यात आले होते. अन्न साठवणुकीचा ‘फर्स्ट इन, फर्स्ट आऊट’ (FIFO) हा मूलभूत नियमही पाळला जात नव्हता. यामुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
परवाना निलंबित; व्यवसाय बंद करण्याचे आदेश
या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर एफडीएने मंगळवारी हॉटेल व्यवस्थापनाला नोटीस बजावत अन्न परवाना तात्काळ निलंबित केल्याची माहिती दिली. निलंबन कालावधीत हॉटेलला कोणतेही अन्नपदार्थ तयार करणे, प्रक्रिया करणे, साठवणे किंवा विकणे तसेच ग्राहकांना अन्नसेवा पुरविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा’ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
एफडीएचा मोठा दणका; इतर हॉटेल्ससाठी इशारा
एफडीए सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले की, हॉटेलमधील त्रुटींबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन-तीन दिवस पथकाने पाहणी केली. माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतरच ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे केवळ अमरप्रीत हॉटेलच नव्हे, तर शहरातील इतर मोठ्या हॉटेल्सच्या चालकांमध्येही खळबळ उडाली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत राज्यभरात अशा कारवायांचा धडाका सुरू असून, अन्न सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.



















