मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. विखे-पाटील यांच्यावर दगाबाजीचा आरोप करत फडणवीस यांना निष्क्रिय मुख्यमंत्री म्हटले. वाचा सविस्तर.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने आपले निर्णय घेतले असून, आता अंतरवालीला कोणतेही शिष्टमंडळ न पाठवण्याचा सरकारचा मानस आहे. या निर्णयावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सरकारला समजून घ्यायचे असेल तर सरकार बाप आहे का? त्यांनी घ्यायचे निर्णय घेतले आहेत.”
विखे-पाटील यांच्यावर दगाबाजीचा आरोप
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी विशेष संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “विखे-पाटील मराठ्यांचे वाटोळे करत आहेत. त्यांनी वर्षभर केवळ देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान गायले आणि शरद पवार यांनी काहीच दिले नाही, असे तुणतुणे वाजवले. मराठ्यांना मोठं करण्याचा विडा घेतला असेल, तर अपमान पचवायची ताकद ठेवा.”
पुढे बोलताना त्यांनी विखे-पाटील यांना सपशेल अपयशी ठरवत म्हटले, “तुम्ही मराठ्यांना दगा दिला आहे. तुमच्यामुळेच मराठ्यांचे वाटोळे झाले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला आधीच सावध केले होते की, विखे-पाटील दगाबाज आहेत. विखेंसारखा उपसमितीचा अध्यक्ष असल्याने मराठ्यांचे वाटोळे होणारच होते.”
फडणवीस यांना ‘निष्क्रिय मुख्यमंत्री’ म्हटले
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. ते मराठा आरक्षण देत नाहीत. त्यांचे सर्व काही केवळ दिखावा आहे.”
जरांगे पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, “तुमचे ठरले आहे की मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करायचा. याला पाऊल म्हणतात का? आम्ही कधीही अंतरवालीमध्ये येणार नाही, असे तुम्ही म्हणत आहात. पण तुम्ही मराठ्यांना कलंक आहात. तुम्हाला अंतरावलीमध्ये कोणी बोलवत नाही.”
विखे-पाटील यांना आव्हान
आपल्या भाषणात जरांगे पाटील यांनी विखे-पाटील यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे. मी तुला उखडून टाकेन. विखेंना यापासून पळ काढता येणार नाही.”
तसेच त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “तुम्ही मला जेलमध्ये टाकायचे असेल तर टाका. पण 12 तारखेला आमची बैठक निश्चित आहे. ती होऊन राहील.”















