देवाच्या दारात आलेल्या माणसाचा अपघाती जीव गेला तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचं? देवाला की माणसाला? परभणीच्या यशवाडी गावात शनिवारी दुपारी जे घडलं त्याचा व्हिडीओ पहिला तरी अंगावर काटा येतो. भाविक मारुतीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. आत दर्शन घेणारे 25 जण देवाला हात जोडत होते. आणि त्याच क्षणी वर असलेल्या मोठमोठ्या संगमरवरी दगडांनी खाली यायला सुरुवात केली. एक आवाज आला, धुळीचे लोट उठले, आणि होत्याचे नव्हते झाले. देवळात गेलेले लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि जे वाचले ते हे दृश्य डोळ्यांनी बघतच राहिले. तर ह घटना का घडली ? या घटनेत दोष कोणाचा ? निकृष्ट दर्जाचे काम सुरु होते का ? सविस्तर पाहूया या…
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात परभणी-मानवत महामार्गावर यशवाडी हे एक छोटसं गाव आहे. या गावात त्रिमूर्ती इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे जे संपूर्ण मराठवाड्यात जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. परभणी, जालना, हिंगोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून दर शनिवारी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. काही अहवालांनुसार शनिवारी इथे 25 हजार ते 50 हजार भाविक येत असतात. शनिवार हा हनुमानाचा वार म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दिवशी मंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. हे मंदिर पूर्वी साध्या पत्र्याचं होतं पण गेल्या काही वर्षांत भाविकांच्या देणगीतून मंदिराचं संगमरवरात बांधकाम करण्यास सुरुवात केली. गाभारा आणि मंदिराचा कळस पूर्ण झाला पण सभा मंडपाचं बांधकाम मात्र अर्धवट राहिलं होतं.
20 जून 2026 रोजी शनिवार होता. सकाळपासूनच यशवाडी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी करायला सुरुवात केली होती. मंदिर परिसरात कीर्तन सुरू होतं, महाप्रसादाची तयारी चालू होती आणि आजूबाजूच्या गावांमधून आलेले 700 ते 800 लोक परिसरात जमले होते. बाहेर रांग लांबत होती आणि आत सभा मंडपात एक एक करत भाविक दर्शनासाठी पुढे सरकत होते.
हा सभा मंडप म्हणजे मुख्य गाभाऱ्यासमोरचा बांधकामाचा भाग. इथे पिलर उभारलेले होते आणि त्यावर मोठमोठे संगमरवरी दगड एकावर एक रचलेले होते. या दगडांना आधार म्हणून लाकडाच्या बल्ल्या लावलेल्या होत्या. दुसरा कोणताच पक्का आधार नव्हता. त्या बल्ल्या दोन वर्षांहून अधिक काळ उन्हात तापल्या होत्या, पावसात भिजल्या होत्या आणि आतून सडत होत्या.
दुपारी तीन वाजून गेले होते. सभा मंडपात सुमारे 25 भाविक उपस्थित होते. कुणी हात जोडत होते, कुणी नमस्कार करत होते. त्याच वेळी वरून काहीतरी सरकत असल्याचा आवाज आला. काहींनी वर बघितलं तर मोठे दगड हळूहळू खाली झुकत होते. पळायला उठायच्या आतच सगळं सेंट्रिंग कोसळलं. पिलर, दगड, मार्बल सगळं एकत्र खाली कोसळलं आणि क्षणार्धात 25 जण ढिगाऱ्याखाली गेले. कोसळण्याचा आवाज इतका जबरदस्त होता की बाहेर रांगेत उभे असलेले लोक घाबरून दूर पळाले. मंदिरासमोर धुळीचे आणि धुराचे लोट उठले आणि सगळा परिसर काही क्षणांत स्तब्ध झाला.
आत काय झालंय हे कळताच स्थानिक लोकांनी स्वतःच धावत येऊन मोठ्या पहारी आणि दोऱ्या घेऊन बचाव सुरू केला. एक एक दगड बाजूला सारत ते आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. पण आव्हान मोठं होतं कारण अजून वरचे काही दगड अधांतरी लटकलेले होते आणि बचाव करताना पुन्हा पडझड होण्याची भीती होती. तरीही त्यांनी माघार घेतली नाही.
थोड्याच वेळात जिल्हा प्रशासन सक्रिय झालं. जिल्ह्यातल्या शासकीय आणि खाजगी मिळून जवळपास 50 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेन आणि जेसीबी मशिनरीच्या मदतीने बचाव कार्याला वेग आला. तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे हे सगळे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्याचा ताबा घेतला.
एक एक करत ढिगाऱ्याखालून माणसे बाहेर काढली जात होती. काही जिवंत होते, काही जखमी होते, आणि काहींनी प्राण सोडला होता.
या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संतोष सर्जेराव गडदे, आकाश सुरजोसे, मुनेश रामबिलास अग्रवाल, सुरज बाबासाहेब पोपटकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे. एका लहान मुलाचाही यात बळी गेला. 32 जणांना परभणीच्या आरपी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. त्यांपैकी 10 ते 12 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कि हे सगळं टाळता येऊ शकलं असतं का? स्थानिक भाविक आणि रहिवाशांनी जे सांगितलं ते धक्कादायक आहे. ते सेंट्रिंग दोन वर्षांहून अधिक काळ तसंच होतं. लाकडाच्या बल्ल्या कुजून खराब झाल्या होत्या. पहिल्यांदा मंदिरात येणाऱ्या माणसालाही हे बांधकाम धोकादायक वाटत होतं असं स्थानिक सांगतात. मंदिरावर माकड उड्या मारत असल्याने दगड हळूहळू सरकत होते अशी माहितीही प्राथमिक स्तरावर दिली जाते. पण एवढं सगळं माहीत असतानाही त्या धोकादायक बांधकामात भाविकांना दर्शनासाठी का जाऊ दिलं जात होतं? या टेबलावर पादुका ठेवल्या होत्या आणि लोक कुजलेल्या लाकडांमधून वाट काढत आत येऊन दर्शन घेऊन जायचे. मंदिर प्रशासनाने हे वेळीच थांबवलं का नाही.
दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आणि मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही X वर शोक व्यक्त करत जखमींच्या लवकर बऱ्या होण्याची प्रार्थना केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि आमदार राजेश विटेकर घटनास्थळी दाखल झाले. आमदार विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना बांधकाम बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने लाकूड कुजले आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला. एनसीपी आमदार राजेश विटेकर यांनी सांगितलं की ढिगाऱ्याखाली अडकलेले सगळे जण बाहेर काढण्यात आले असून 27 जण उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. बांधकाम गुणवत्तेत दोष होता की सुरक्षा नियम पाळले नाहीत याचाही तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
यशवाडीच्या या दुर्घटनेने एक गोष्ट समोर आली. आपण देवळात जातो तेव्हा आपला विश्वास असतो की या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. पण जेव्हा त्याच देवळाचं अर्धवट बांधकाम जीव घेतं तेव्हा प्रश्न पडतो की जबाबदारी कुणाची? एकीकडे मंदिरात लोखंडी शेड बांधले जातात, बाहेर नवे बांधकाम होतं, पण सभा मंडपाचे कुजलेले लाकडे बदलण्याची तसदी कुणी घेत नाही. हे फक्त यशवाडीचीच नाही, तर महाराष्ट्रातील शेकडो मंदिरांची हीच कथा आहे. यांपैकी किती मंदिरांत अशा धोकादायक परिस्थिती आहेत हे कुणाला माहीत आहे? आणि हे माहीत असूनही आपण दुसऱ्या दुर्घटनेची वाट बघणार आहोत का?






