मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर CAG चा अहवाल समोर. ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च, ९२ लाख अपात्र लाभार्थी, पुरुषांकडून वसुलीची प्रक्रिया सुरु… वाचा सविस्तर.
योजनेतून 92 लाख लाभार्ती वगळले.
योजनेच्या पडताळणीदरम्यान मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. सरकारने केलेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल ९२ लाख महिलांची योजनेतून नावे वगळण्यात आली आहेत. सुरुवातीला २.४ कोटी लाभार्थी होते, त्यापैकी सुमारे ३८ टक्के लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
या ९२ लाखांपैकी सुमारे ६२ लाख (सुमारे ६७ टक्के) लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांना वगळण्यात आले. यापूर्वी सरकारने ८० लाख लाभार्थी कमी झाल्याचे सांगितले होते, मात्र आता हा आकडा ९२ लाखांवर पोहोचला आहे.
पुरुष लाभार्थ्याकडून वसुली होणार
योजना महिलांसाठी असूनही, काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळवणाऱ्या पुरुषांकडून पैसे परत करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी अशा पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आदिती तटकरे यांनी सांगितले की, शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया आठ-दहा महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही वसूल केलेली रक्कम थेट ट्रेझरीकडे जमा होते, विभागाकडे परत येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















