बोगस बियाण्यांची फसवणूक टाळा. घरच्या घरी उगवण क्षमता कशी तपासावी, खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करावी, जाणून घ्या सविस्तर.
बियाणे खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी
बाजारातून बियाणे खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम बियाण्याच्या पाकिटावरील प्रमाणपत्र टॅग आणि कालबाह्यता तारीख तपासा. पाकिटावर पिकाचे नाव, जातीचा प्रकार, बीज परीक्षणाची तारीख यासारखी माहिती असते, ती काळजीपूर्वक वाचा.
कोणत्याही फेरीवाल्याकडून किंवा मूळ किंमतीपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या बियाण्यांना बळी पडू नका. अनेकदा जुनी बियाणे नवीन पाकिटात भरून विकली जातात. त्यामुळे नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करा. तसेच खरेदी करताना पक्के बिल (GST बिल) घेणे अत्यंत आवश्यक आहे. बिलावर बियाण्याचा लॉट नंबर आणि इतर तपशील नोंदवलेला असावा.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बाजारात काही कंपन्या नामांकित कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असणारी नावे, समान डिझाईन आणि रंगसंगती वापरून बियाणे विकतात. अशा बनावट पाकिटांपासून सावध रहा. पक्क्या बिलाशिवाय आणि अधिकृत विक्रेत्याशिवाय बियाणे खरेदी करू नका.
बोगस बियाणे घरच्या घरी तपासा
बाजारातील बियाणांवर अविश्वास असल्यास किंवा घरची बियाणे वापरायची असल्यास, पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. घरच्या घरी कमी खर्चात ही चाचणी करता येते. उगवण क्षमता तपासण्याची सोपी गोणपाट पद्धत खालीलप्रमाणे:
१. एका ओल्या गोणपाटावर १०० बियाणे घ्या. १०-१० च्या रांगेत, दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर बियाणे अंथरा.
२. बियाण्यांवर दुसरे गोणपाट टाकून ते गुंडाळा.
३. दररोज या गुंडाळीवर पाण्याची फवारणी करा.
४. एक आठवड्यानंतर गुंडाळी उघडून पहा.
५. जर १०० पैकी ७० बियाण्यांनी चांगले कोंब फुटले असतील, तर त्या बियाण्यांची गुणवत्ता चांगली आहे, असे समजा.
या सोप्या पद्धतीने तुम्ही पेरणीपूर्वीच बियाण्यांची गुणवत्ता तपासू शकता. त्यानंतरच ती बियाणे पेरणीसाठी वापरा.
बोगस बियाणे आढळल्यास कुठे कराल तक्रार?
बोगस बियाणे आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके वेळोवेळी कारवाई करतात. बोगस बियाण्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाथी शेतकरी 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
तसेच केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे आणण्याची तयारी केली आहे. नवीन बियाणे कायद्यांतर्गत बनावट बियाणे विकणाऱ्यांवर मोठा दंड आणि कठोर कारवाईची तरतूद आहे. नवीन कायद्यानुसार प्रत्येक बियाण्याच्या पाकिटावर QR कोड असेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याची संपूर्ण माहिती मिळू शकेल.














