लकी ज्यूस सेंटर, मुदतबाह्य दूध, मँगो पल्प व फ्रोझन डेझर्टचा वापर उघडकीस
मराठवाडा अपडेट 24 छत्रपती संभाजीनगर : शहरातील अन्नसुरक्षेच्या घटना समोर येत असताना नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील प्रसिद्ध रेस्टॉरंटवर झालेल्या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पैठण गेट येथील प्रसिद्ध लकी ज्यूस सेंटरवर कारवाई केली आहे. या छाप्यात ज्यूस सेंटरमध्ये मुदतबाह्य दूध, मँगो पल्प तसेच आइस्क्रीमऐवजी फ्रोझन डेझर्टचा वापर करून ज्यूस तयार केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
आइस्क्रीमच्या नावाखाली फ्रोझन डेझर्ट विकल्याचेही उघड.
अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांच्या नेतृत्वाखाली किर्तीका झाडे, प्रशांत अजिंठेकर व फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने गुरुवारी (२ जुलै) सायंकाळी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान दुकानातील घाणेरड्या परिस्थितीने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. मुदतबाह्य दूध व मँगो पल्पचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तसेच ग्राहकांना आइस्क्रीमच्या नावाखाली फ्रोझन डेझर्ट विकल्याचेही उघड झाले.
दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई आज, ३ जुलै रोजी.
अन्न सुरक्षा नियमांचे घोर उल्लंघन करणाऱ्या या दुकानमालकाला स्वच्छता राखण्यासह सर्व नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विभागाने या प्रकरणी दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई आज, ३ जुलै रोजी करणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांमध्ये संताप लाट, या कारवाईचे केले स्वागत.
मुदतबाह्य व घाणेरड्या पदार्थांपासून ज्यूस बनवून पैसे उकळणाऱ्या या दुकानदारांच्या कृतीमुळे शहरातील नागरिक संतापले आहेत. “हे लोक पैसे घेऊन लोकांच्या जिवाशी असे का खेळतात?” असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
FDA चा स्पष्ट इशारा
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट सांगितले आहे कि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही दुकानाला सवलत दिली जाणार नाही. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असून, सर्व अन्न विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.



















