• Home
  • Agriculture
  • आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?
Image

आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे गवत कापत असताना ३८ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला; मुलाला रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या खुणा आढळल्याने खळबळ.

बीड: आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. टकले वस्तीवरील ३८ वर्षीय शेतकरी देवीदास ऊर्फ पिंटू माणिक टकले यांच्यावर डोंगर परिसरात दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. हिंस्र प्राण्याने त्यांना तब्बल ५०० मीटर अंतरावर ओढून नेले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला वाघाने केला की बिबट्याने, याबाबत अद्याप संभ्रम कायम असून वनविभाग ठसे आणि पुराव्यांची तपासणी करत आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे देवीदास टकले हे घराजवळच असलेल्या सोनीपठार डोंगर भागात जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. सकाळी ८:३० ते ९:०० वाजेच्या सुमारास ते गवत कापत असताना पाठीमागून आलेल्या हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. प्राण्याने त्यांच्या मानेवर आणि शरीरावर पकड मिळवत त्यांना सुमारे अर्धा किलोमीटर (५०० मीटर) लांब असलेल्या दाट काटेरी झुडपांमध्ये ओढत नेले.

दरम्यान, वडिलांनी कापलेले गवताचे ओझे डोक्यावरून आणण्यासाठी त्यांचा मुलगा डोंगरावर गेला असता, त्याला वाटेत ठिकठिकाणी रक्ताचे थारोळे आणि ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या. घाबरलेल्या मुलाने तातडीने वस्तीवर जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. गावकऱ्यांनी काठ्या-कुऱ्हाडी घेऊन डोंगराच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांचा आरडाओरडा आणि मोठा जमाव पाहून जाळीत लपलेल्या प्राण्याने मृतदेह सोडून दाट जंगलात पळ काढला. मात्र, तोपर्यंत गंभीर जखमांमुळे देवीदास यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

वाघ की बिबट्या? संश्रम कायम

या हल्ल्यामागे नेमका कोणता प्राणी आहे, याबाबत वनविभागाकडून अधिकृत निष्कर्ष अद्याप काढला गेलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच पाटोद्याची हद्द ओलांडून टिपेश्वरचा पट्टेदार नर वाघ रामलिंग आष्टी वनपरिक्षेत्रातील भुरेवाडी शिवारात ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता. या वाघाने यापूर्वी पाटोद्यात जनावरांची शिकार केली होती. प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांच्या मते, हा हल्ला पूर्ण वाढ झालेल्या वाघानेच केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या भागात बिबट्यांचाही वावर असल्याने हा हल्ला नेमका वाघाने केला की बिबट्याने, याबाबत अधिकृत निष्कर्ष काढला जात आहे.

वनविभागाची तपासणी सुरू

घटनेची माहिती मिळताच आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अमोल मुंडे, वनपाल दत्तात्रय जायभाय, लक्ष्मण तागड, अशोक काळे यांच्यासह वनविभागाचे विशेष शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पाऊलखुणांची पडताळणी सुरू असून परिसरातील पायांचे ठसे (पगमार्क), नखांच्या खुणा आणि केस यांची वैज्ञानिक तपासणी केली जात आहे.

“आमचे पथक प्रत्यक्ष घटनास्थळी असून परिसरातील पायांचे ठसे, नखांच्या खुणा आणि केस यांची वैज्ञानिक तपासणी केली जात आहे. हल्ला नेमका वाघाने केला आहे की बिबट्याने, हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल. शेतकऱ्यांनी सध्या जंगलात किंवा डोंगराळ भागात जाणे पूर्णपणे टाळावे,” असे आवाहन अमोल मुंडे यांनी केले आहे.

परिसरातील भीती अधिक वाढली

आष्टी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने नागरिक आणि शेतकरी आधीच भयभीत झालेले आहेत. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये आष्टी तालुक्यातील बावी येथे राजेंद्र गोल्हार या ३६ वर्षीय शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वाघाची एंट्री झाल्याने परिसरातील भीती अधिक वाढली आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि रात्री किंवा पहाटे एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

दुष्काळात पिके वाचवा! 19:19:19 फवारणीने मिळवा भरघोस उत्पादन

पाण्याच्या ताणाखालील पिकांसाठी 19:19:19 खताची फवारणी कमी खर्चात फायदेशीर ठरते. जाणून घ्या फवारणीचे प्रमाण, फायदे आणि योग्य वेळ.…

ByByrushikesh Nov 6, 2026

शेतकऱ्यांना पहिली उचल ३,९०० रुपये, किणी येथील ऊसदर आंदोलन मागे;

कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ६१ तास चाललेले चक्काजाम अखेर मागे; कारखानदारांनी पहिली उचल ३,९०० रुपये,…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top