• Home
  • Chatrapati sambhajinagr
  • चलता है’ आता चालणार नाही! HSRP मुळे जुनी वाहने रडारवर; RTO चा इशारा, कागदपत्रे नसल्यास कारवाई
Image

चलता है’ आता चालणार नाही! HSRP मुळे जुनी वाहने रडारवर; RTO चा इशारा, कागदपत्रे नसल्यास कारवाई

छत्रपती संभाजीनगरात HSRP बसविल्यानंतर जुन्या दुचाकींचा डेटा ऑनलाइन झाला. विमा-पीयूसी नसलेल्या वाहनांची नोंद ‘कायमस्वरूपी अभिलेखागारात’ हलवत केंद्र सरकार थेट मेसेज पाठवत आहे. जाणून घ्या काय करावे.

छत्रपती संभाजीनगर: एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची मोहीम राबविल्यानंतर जुन्या वाहनांची माहिती परिवहन विभागाच्या डेटाबेसमध्ये अद्ययावत झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे, वर्षानुवर्षे विना विमा आणि विना पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या दुचाकी आता थेट केंद्र सरकारच्या रडारवर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा वाहनधारकांच्या मोबाइलवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) नावाने विमा आणि पीयूसी नूतनीकरणाबाबत संदेश येत आहेत. दीर्घकाळ कागदपत्रे नूतनीकरण न केलेल्या वाहनांची नोंद ‘कायमस्वरूपी अभिलेखागारात’ (Permanent Archive) हलविल्याचे या संदेशांत स्पष्ट नमूद आहे.

HSRP मुळे वाहनांचा डेटा ऑनलाइन

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. या मोहिमेत मोठ्या संख्येने जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी नोंदणी केली. या प्रक्रियेत वाहनांची माहिती परिवहन विभागाच्या संगणकीय प्रणालीत अद्ययावत झाली. त्यामुळे आता केवळ नंबर प्लेट बदलून जबाबदारी संपत नाही, तर वाहनाचा विमा आणि पीयूसीही वैध असणे आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले आहे.

केंद्र सरकारचे थेट संदेश

MoRTH कडून येणाऱ्या संदेशांमध्ये असे नमूद आहे की, विमा आणि पीयूसी दीर्घकाळ नूतनीकरण न केल्यामुळे संबंधित वाहनाची नोंद ‘कायमस्वरूपी अभिलेखागारात’ हलविण्यात आली आहे. वैध विमा आणि पीयूसीशिवाय वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्यानुसार कायद्याचे उल्लंघन असल्याचा इशाराही या संदेशांत देण्यात आला आहे.

‘कायमस्वरूपी अभिलेखागार’ म्हणजे नेमकं काय?

‘परमनंट आर्काइव्ह’ म्हणजे वाहन भंगारात गेले किंवा मालकी संपली, असा अर्थ नाही. वाहनाची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये संग्रहित श्रेणीत हलविण्यात आल्याचे यातून सूचित होते. केंद्रीय वाहतूक धोरणानुसार, वाहनाचा विमा किंवा पीयूसी कालबाह्य झाल्यास वाहन सुरुवातीला ‘तात्पुरते निष्क्रिय’ (Temporary Archive) केले जाते. या काळात ऑनलाइन कागदपत्रे अपडेट करण्याची संधी असते. मात्र, सलग दोन ते तीन वर्षे वाहनधारकाने कोणतीही हालचाल न केल्यास, प्रणाली त्या गाडीचे नोंदणी ‘परमनंट आर्काइव्ह’ श्रेणीत वर्ग करते. अशी गाडी रस्त्यावर चालवणे हा मोटर वाहन कायद्यानुसार गंभीर कायदेशीर गुन्हा ठरतो.

छत्रपती संभाजीनगरचं चित्र काय?

छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यक्षेत्रात एचएसआरपी बसविण्याबाबत मोठी तफावत दिसून आली आहे. ३० जूनची अंतिम मुदत संपल्यानंतरही तब्बल १ लाख ६८ हजार वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी नोंदणीच केलेली नाही. अशा वाहनांवर १ जुलैपासून कारवाई सुरू झाली असून, प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारला जात आहे. ज्या वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना तूर्तास दंडातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील एकूण २ लाख ६७ हजार वाहनांपैकी तब्बल १ लाख ७८ हजार १५६ वाहने अद्याप एचएसआरपीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहितीही समोर आली आहे.

वाहनधारकांनी काय करावे?

‘परमनंट आर्काइव्ह’ झालेली वाहनं ऑनलाइन थेट सक्रिय करता येत नाहीत. त्यासाठी मूळ आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तज्ज्ञांनी सुचवलेली पद्धत अशी:

  1. वैध कागदपत्रे काढा: वाहनाचा नवीन विमा आणि अधिकृत केंद्रातून पीयूसी काढून घ्या.
  2. RTO कार्यालयाला भेट द्या: ज्या आरटीओमध्ये गाडीची नोंदणी आहे, त्या कार्यालयात प्रत्यक्ष जा.
  3. कागदपत्रे सादर करा: वैध विमा प्रमाणपत्र, पीयूसी आणि मूळ आरसी बुक अधिकाऱ्यांकडे सादर करा. जुना रोड टॅक्स किंवा प्रलंबित दंड असल्यास तो भरा.
  4. मंजुरी मिळवा: आरटीओ अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर वाहनाचे स्टेटस ‘परमनंट आर्काइव्ह’वरून पुन्हा ‘Active Compliant’ केले जाईल.

पुढे काय?

वाहनधारकांनी विमा आणि पीयूसी नूतनीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास केवळ आर्थिक दंडच नाही, तर वाहनाची नोंदणीच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे एचएसआरपी बसविल्यानंतरही कागदपत्रे अद्ययावत ठेवणे अनिवार्य आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील वाहनधारकांनी आरटीओच्या अधिकृत पोर्टलवर आपल्या वाहनाची स्थिती तपासून आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे.

Related Posts

मराठवाड्याचा दुष्काळ संपवणार! जपानकडून वॉटर ग्रीडला २० हजार कोटींचा निधी, सहा धरणे जोडणार

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जायका (JICA) कडून २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाला सकारात्मक प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर,…

ByByrushikesh Nov 7, 2026

आष्टीत वन्यप्राण्याचा कहर: शेतकरी देवीदास टकले यांचा मृत्यू; ५०० मीटर फरफटत नेले, वाघ की बिबट्या?

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे गवत कापत असताना ३८ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला; मुलाला रक्ताचे डाग आणि ओढत नेल्याच्या…

ByByrushikesh Nov 7, 2026

३० लाख द्या अन् दोन मुलांना नोकरी लावा, नाहीतर जेसीबी जाळू”; पोलिसांसमोरच धमकी, कंपनीच्या सुरक्षारक्षकासह आई-वडिलांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून ३० लाख रुपयांची खंडणी आणि दोन मुलांना नोकरीची…

ByByrushikesh Nov 6, 2026

दुष्काळात पिके वाचवा! 19:19:19 फवारणीने मिळवा भरघोस उत्पादन

पाण्याच्या ताणाखालील पिकांसाठी 19:19:19 खताची फवारणी कमी खर्चात फायदेशीर ठरते. जाणून घ्या फवारणीचे प्रमाण, फायदे आणि योग्य वेळ.…

ByByrushikesh Nov 6, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top