छत्रपती संभाजीनगर: शहराच्या छावणी परिसरात वसलेले कर्णपुरा देवी मंदिर संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे मंदिर शहराचे ग्रामदैवत मानले जाते. नवरात्रोत्सवात येथे दूरदूरवरून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. काळ्या पाषाणात घडवलेली देवीची मूर्ती, राजस्थानी वास्तुशैली आणि 400 वर्षांची यात्रा परंपरा यामुळे या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिकच वाढले आहे.
मंदिराची स्थापना कशी झाली?
ऐतिहासिक नोंदींनुसार, इसवी सन 1835 च्या सुमारास राजस्थानातील बिकानेरचे राजा कर्णसिंह हे छत्रपती संभाजीनगर परिसरात वास्तव्यास आले होते. ते कर्णिका मातेचे परमभक्त होते. छावणी परिसरातील खाम नदीच्या पूर्वेला त्यांनी आपल्या लवाजाम्यासह छावणी टाकली होती. राजा कर्णसिंह यांचे या परिसरात साधारण 20 ते 25 वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला ‘कर्णपुरा’ हे नाव पडले.
राजस्थानातील कर्णिका मातेचे भक्त असलेल्या कर्णसिंह यांनी याच परिसरात देवीचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानी शैलीत हे मंदिर उभारण्यात आले. कालांतराने 1982 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
नेमकं काय पाहायला मिळतं?
कर्णपुरा देवी मंदिरात प्रवेश करताच भव्य सभामंडप नजरेस पडतो. सभामंडपाच्या डाव्या बाजूला देवीचा गाभारा आहे. या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात घडवलेली देवीची मूर्ती विराजमान आहे. मुकुट, वस्त्र आणि विविध आभूषणांनी सजलेले देवीचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेते. देवीच्या मूर्तीमागील प्रभावळीवर आकर्षक कलाकुसर पाहायला मिळते.
मंदिरात जाताना प्रथम सिद्धिविनायक मंदिर लागते. या गणपतीचे दर्शन घेऊन नंतर देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील मोठ्या खिडक्यांमुळे येथे पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असते.
400 वर्षांचा इतिहास आणि यात्रा परंपरा
कर्णपुरा देवीची यात्रा संभाजीनगर परिसरातील एकमेव जुनी यात्रा मानली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही यात्रा येथे भरते. शारदीय नवरात्रोत्सवात येथे दहा दिवस मोठी यात्रा भरते. या दहा दिवसांत कर्णिका देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून कर्णपुरा देवीची ख्याती आहे.
मंदिराचे विश्वास दानवे कुटुंबीय आहेत. दानवे कुटुंबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे. प्रत्येक वर्षी नित्यनियमानुसार नवरात्रीला घटस्थापना केली जाते. दसऱ्याच्या दिवशी कर्णपुरा येथील बालाजीच्या रथाची मिरवणूक काढली जाते. हा 150 वर्षांपूर्वीचा टेकूचा रथ सुमारे 23 फूट उंच असून त्याचे वजन सुमारे 20 टन आहे.
प्रशासन आणि मागण्या
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी कर्णपुरा देवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. ‘कर्णपुरा येथील देवीचे मंदिर 400 वर्षे जुने आहे. नवरात्रोत्सवात येथे 10 दिवस यात्रा भरते. त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी आता सरकारी साहाय्याची आवश्यकता आहे,’ असे ते म्हणाले होते.















