सोलापूर ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यानुसार केलेल्या कारवाईत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सोलापूर: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कारवाई कायद्यानुसार (MPDA) मोठी कारवाई केली आहे. आठवडाभरापासून फरार असलेल्या कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे .
आक्रमक टीका आणि रोखठोक वक्तव्यांमुळे ते सोलापूरच्या राजकारणात चर्चेत
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्धनगरी येथील रहिवासी असलेले शरद कोळी हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत. सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टीका आणि रोखठोक वक्तव्यांमुळे ते सोलापूरच्या राजकारणात चर्चेत असतात . पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे .
सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेश क्रमांक २०२६/डी.सी.बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ अन्वये शरद कोळी यांच्याविरोधात स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली होती . कारवाईचे आदेश जाहीर झाल्यापासून कोळी फरार होते .
आठवडाभर फरार, सांगलीतून ताब्यात
कारवाईचे आदेश जाहीर झाल्यानंतर शरद कोळी सलग आठवडाभर फरार होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध सुरू केला होता . अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळी यांना सांगली येथून ताब्यात घेतले . ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
वैद्यकीय तपासणीनंतर येरवड्यात रवानगी
रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शरद कोळी यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली . त्यांना एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे .
कोळी यांच्यावरील गुन्ह्यांची पार्श्वभूमी
शरद कोळी यांच्यावर वाळू चोरी, खंडणी वसूल करणे, धमकी देणे आणि अश्लील भाषेत संभाषण करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत . त्यांच्यावर खंडणी मागणे, धमकी देणे अशा जवळपास ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे . त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पंढरपूर तालुका पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कठोर पावले उचलली .
MPDA अन्वये कारवाई म्हणजे काय?
MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अन्वये कारवाई म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराला किंवा समाजासाठी घातक ठरणाऱ्या व्यक्तीला विना-जमीन थेट तुरुंगात स्थानबद्ध करणे होय. हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत कडक कायदा असून, याचा मुख्य उद्देश समाजात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हा आहे .
या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या कथित धोकादायक किंवा समाजविघातक कृत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. संबंधित व्यक्तीकडून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाला वाटत असल्यास या कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश दिले जाऊ शकतात . या कारवाईअंतर्गत आरोपीला थेट १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले जाऊ शकते.
कोण आहेत शरद कोळी?
शरद विठ्ठल कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्धनगरी येथील रहिवासी आहेत. २०१२ मध्ये ते शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘धाडस’ या सामाजिक संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून सोलापूरसह विविध भागांत संघटनात्मक काम केल्याचा दावा केला होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर २०२२ मध्ये शरद कोळी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर युवासेनेच्या विस्ताराची जबाबदारी देण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये शरद कोळी यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली . पक्षाच्या कार्यकारिणीच्या विस्तारावेळी सोलापूरमधून त्यांचा उपनेते म्हणून समावेश करण्यात आला होता.
राजकीय प्रतिक्रिया
शरद कोळी यांच्यावरील या कारवाईनंतर ठाकरे गटाच्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांकडून केला जात आहे . सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे.
मराठवाडा अपडेट 24
विश्वासार्ह • वेगवान • निर्भीड

















