महाराष्ट्रातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा घटला असून मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे.
राज्यातील जलसाठ्याची सद्यस्थिती
जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील मोठ्या, मध्यम आणि लघु धरणांमध्ये सध्या ४४.५६ टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ६०.५३ टक्के होता, यावरून पाणीसाठ्यातील घट स्पष्ट होते.
विभागनिहाय पाणीसाठा पुढीलप्रमाणे
- मराठवाडा विभाग – सर्वात गंभीर स्थिती असून केवळ २५.३९% पाणीसाठा शिल्लक
- पुणे विभाग – ५२.७१% (गेल्यावर्षी ७२.१८%)
- कोकण विभाग – ६२.६% (सर्वाधिक)
- नाशिक विभाग – ४१.७२%
- नागपूर विभाग – ३९.७६%
- अमरावती विभाग – ४२.२६%
कोकण विभाग वगळता इतर सर्व विभागांत पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
मराठवाड्यातील प्रमुख धरणांची स्थिती
मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ ३१.४१% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला हा साठा ७६.३८% इतका होता, ही बाब धक्कादायक आहे. जायकवाडी धरणात आज ६८१.८६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
इतर धरणांतील पाणीसाठा
- माजलगाव धरण (बीड) – १६.७३%
- मांजरा धरण – १६.६४%
- सिद्धेश्वर धरण (हिंगोली) – शून्य
- येलदरी धरण – ५१.९३%
- विष्णुपुरी धरण (नांदेड) – ३४.९७%
- सीना कोळेगाव (धाराशिव) – शून्य
- निम्न तेरणा धरण – ३०.२८%
- निम्न दुधना (परभणी) – २३.९५%
महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. पुढील काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावण्याची आशा आहे. शेतकरी, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, जलसंपदा विभागाने तातडीने दीर्घकालीन पाणीव्यवस्थापनाचे नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.














