पावसाळ्यात खत-युरियाची टंचाई भासत आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 वर कॉल करा. ऑनलाईन pgportal.gov.in वर तक्रार दाखल करा.
पेरणीनंतर खत-युरियाची लगबग; तक्रारीसाठी उपलब्ध अनेक माध्यमे
सध्या राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता पिकांना वेळेवर खते व युरिया मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. मात्र, काही ठिकाणी खताचा काळाबाजार तसेच वेळेवर पुरवठा न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत खत-युरियाची टंचाई जाणवल्यास किंवा काळाबाजाराचा संशय आल्यास शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
खतांची कमतरता किंवा दुकानदारांच्या मनमानीवर कुठे कराल तक्रार?
खत, युरिया आणि शेतीतील अन्य साहित्याच्या वितरणात गडबड झाल्यास शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रत्येक जिल्हा व तालुक्यात कृषी विभागाचे कार्यालय कार्यरत आहे. शेतकरी तेथे जाऊन लेखी अथवा तोंडी तक्रार दाखल करू शकतात.
तसेच, सहकारी सोसायट्यांकडून खत किंवा युरिया देण्यास नकार दिल्यास किंवा एखाद्या दुकानदाराने निर्धारित दरापेक्षा जास्त किंमत आकारल्यास तसेच जादा माल बळजबरीने विकण्याचा प्रयत्न केल्यास ती कृती कायद्याविरुद्ध असून, अशा घटनांची तक्रार जिल्हाधिकारी किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातही करता येते.
टोल-फ्री हेल्पलाइन आणि ऑनलाईन पोर्टलचा पर्याय
जर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक कारवाई झाली नाही किंवा तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची मदत उपलब्ध आहे. ‘किसान कॉल सेंटर’ च्या माध्यमातून शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतो. यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800-180-1551 वर संपर्क साधावा. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर तक्रारीची गंभीर दखल घेतली जाते आणि संबंधित कृषी विभागास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातात.
ऑनलाईन तक्रार प्रणाली अत्यंत सरळ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘PG Portal’ (pgportal.gov.in) उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळावर जाऊन खतांची कमतरता, काळाबाजार, दर्जाहीन खते यासंबंधी ऑनलाईन तक्रार सहजपणे करता येते. या तक्रारींची थेट दखल घेऊन त्यावर कारवाईचे आदेश दिले जातात.
गावपातळीवरही उपलब्ध तक्रारीचे पर्याय
गावागावात कृषी पर्यवेक्षक, पोलीस पाटील किंवा सरपंच यांच्याकडेही तक्रार दाखल करता येते. ग्रामपंचायतीमार्फत सामूहिक तक्रार केल्यास प्रशासनावर अधिक दबाव निर्माण होतो. गावातून मोठ्या संख्येने तक्रारी आल्यास प्रशासन अधिक गंभीरतेने कार्रवाई करते, त्यामुळे अनेकदा समस्या लवकर सुटते.
पावतीशिवाय खरेदी टाळा; नुकसान भरपाईसाठी ठोस पुरावा ठेवा
वेळेवर खते व युरिया न मिळाल्याने पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळाबाजार किंवा खतांच्या तुटवड्याकडे दुर्लक्ष करू नये.
शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत दुकानदाराकडूनच खते व बियाणे खरेदी करावे. खरेदी करताना पक्की पावती घेणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात एखादी फसवणूक उघडकीस आल्यास ही पावतीच तुमच्यासाठी ठोस पुरावा ठरते. पावतीच्या आधारे तुम्ही संबंधित दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता.
शेतकरी मित्रांनो, घ्या नोट:
- खत-युरियाची कमतरता भासल्यास जिल्हा/तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करा.
- कारवाई न झाल्यास टोल फ्री 1800-180-1551 वर कॉल करा.
- pgportal.gov.in वर ऑनलाईन तक्रार दाखल करा.
- गावातील सरपंच, पोलीस पाटील किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार करा.
- फसवणूक टाळण्यासाठी नेहमी पावती घेऊन खरेदी करा.
आपल्या हक्कांसाठी आवाज उठवा. वेळेवर खतांची उपलब्धता होणे हा आपला अधिकार आहे. कोणत्याही अनियमिततेविरोधात त्वरित तक्रार करून आपले शेतीचे नुकसान टाळा.















