• Home
  • Breaking News
  • पोलीस चौकीतच दरोड्याच्या पैशांची वाटणी, तोतया पत्रकार आणि खाकी वर्दीचा धक्कादायक कट उघड
Image

पोलीस चौकीतच दरोड्याच्या पैशांची वाटणी, तोतया पत्रकार आणि खाकी वर्दीचा धक्कादायक कट उघड

घरात चोरी झाल्यावर किंवा अडचणीच्यावेळी ज्या पोलीसाकडे आपण संकटात धाव घेतो, त्याच वर्दीतल्या काही लोकांनी एका व्यापाऱ्याच्या घामाच्या कमाईवर डल्ला मारण्याचा कट रचला. डोळ्यात मिरची पूड फेकली, बनावट पत्रकार उभा केला आणि दरोड्याच्या पैश्याची पोलीस चौकीतच वाटणी केली, हा सगळा प्रकार ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की जर रक्षकच भक्षक बनले तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा? चला तर मग पुण्याला हादरवणाऱ्या या दरोड्याचे संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया…

असा ठरला प्लान

 पुणे आणि पिंपरी चिंचवड हा भाग रियल इस्टेट आणि उद्योगधंद्यांचा मोठा पट्टा आहे, आणि इथे रोख रकमेचे व्यवहार नेहमीचेच आहेत, तळेगाव दाबाडी येथे राहणारे 35 वर्षीय व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या मध्यस्थीने चव्हाण एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीला तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हवी होती. हाच व्यवहार पूर्ण करण्यासाठी 18 जुलैला दुपारी एक ते दोनच्या सुमारास हर्षवर्धन पवार आपल्या एका कामगारासह सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ पोहोचले. गाडीत दोन वेगळ्या बॅगांमध्ये एक कोटी रुपये होते. पण या व्यवहाराची खबर आधीच काही गुन्हेगारांपर्यंत पोहोचली होती, आणि ही खबर पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याच गाडीचा चालक विक्रम चाकणकर होता.

ड्राईव्हरच होता प्लान चा मास्टर माइंड

44 वर्षीय विक्रम चाकणकर हा धायरीचा रहिवासी. या संपूर्ण कटाचा तोच मास्टरमाइंड ठरला. त्याने आपल्या साथीदारांना पैशांची नेमकी माहिती पुरवली, यात सामील होते अमेय कारले, गणेश कदम आणि या सगळ्या कटाचा सूत्रधार, स्वतःला पत्रकार म्हणवणारा आशिष तिवारी होता. विशेष म्हणजे आशिष तिवारी आणि अमेय कारले एकाच इमारतीत राहत होते, आणि सगळे टोळीबाज एकाच परिसरातले.

प्लान एकदम परफेक्ट होता.

नियोजन अगदी बारकाईने केलेलं होतं. पैसे नऱ्हे इथल्या एका बँकेत जमा करायचे होते, आणि गाडीने नेहमीच्या मार्गाने नऱ्हे पुलावरून जाणे अपेक्षित होते. पण चालक विक्रमने ठरलेल्या कटाप्रमाणे गाडी अचानक पुलावरून वळवली आणि मुंबई बेंगलोर हायवेच्या दिशेने नेली. हा मार्ग बदल जाणीवपूर्वक होता, कारण निर्जन जागी गाडी नेऊन दरोडा घालणे सोपे जाणार होते, आणि त्याचबरोबर नऱ्हे पोलिसांचे कार्यक्षेत्र बदलून तांत्रिक फायदा उचलता येणार होता. टोळीने आधीच ठरवले होते की पोलिसांचा बनाव करायचा, हा पैसा दोन नंबरचा आहे अशी भीती दाखवली की व्यापारी घाबरून तक्रार करणारच नाही.

गाडी अडवून लुटले

गाडी नऱ्हे पुलावर पोहोचताच आधीच टपून बसलेल्या दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी आक्रमकपणे गाडी अडवली, आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन जाताय, गाडी बाजूला घ्या अशी दमदाटी सुरू केली. पोलिसांच्या नावाचा वापर करून त्यांनी हर्षवर्धन पवार यांच्या मनात भीती निर्माण केली. गाडी थांबताच बॅगा हिसकवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पवार यांनी आपल्या कष्टाच्या पैशांसाठी कडाडून प्रतिकार केला, पण दरोडेखोरांनी थेट त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

गुन्हा नऱ्हे हद्दीतच घडवून आणायचा डाव.

याच गोंधळात मध्यस्थ किरण आपटे यांनी प्रचंड धाडस दाखवले. साडेतेहत्तर लाख रुपये असलेली एक बॅग घेऊन ते गाडीतून पळ काढण्यात यशस्वी झाले, आणि यामुळेच संपूर्ण एक कोटीची रक्कम टोळीच्या हाती लागली नाही. पण डोळ्यात मिरची गेल्याने हर्षवर्धन पवार गाडीतच अडकले, त्यांच्याकडे उरलेल्या साडेसव्वीस लाखांची दुसरी बॅग होती. दरोडेखोरांनी चालकाला थेट खेड शिवापूर पोलीस चौकीकडे गाडी नेण्यास भाग पाडले, कारण गुन्हा नऱ्हे हद्दीत घडूनही चौकीत त्यांचे खाकी वर्दीतले साथीदार आधीच वाट पाहत होते.

पोलीस चौकीतच घडला सगळं प्रकार

दुपारी दोन वाजता गाडी चौकीत पोहोचली आणि तोतया पत्रकार आशिष तिवारी खाली उतरून मोठमोठ्याने ओरडू लागला, मी पोलीस आहे, या दोन नंबरवाल्यांना पकडून आणलंय. चौकीत उपस्थित होत्या राजगड पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री. इथली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे प्रमिला निकम आदल्या दिवशी चोवीस तास ड्युटीवर होत्या आणि त्या दिवशी त्यांना सुट्टी होती, तरीही त्या वर्दी घालून चौकीसमोरच्या एका हॉटेलबाहेर याच गाडीची वाट पाहत बसल्या होत्या. यावरून हे स्पष्ट होते की आशिष तिवारी आणि प्रमिला निकम यांच्यात आधीच साटेलोटे झालेले होते.चौकीत पोहोचल्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी निकम आणि मेस्त्रींनी उलट पवार यांनाच धमकावायला सुरुवात केली. तुम्ही दोन नंबरचा धंदा करता, आत्ताच अटक करतो अशी भीती घातली गेली. याच दबावाखाली टोळीने पवार यांच्याकडच्या साडेसव्वीस लाखांपैकी वीस लाख रुपये चुपचाप बाजूला काढले. रेकॉर्डवर फक्त साडेसहा लाख दाखवायचे आणि उरलेले वीस लाख स्वतःच्या खिशात घालायचे, असा हा हिशोब होता. ही रक्कम आशिष तिवारीने त्याच्या दुचाकीच्या डिकीत लपवली, आणि यात प्रत्यक्ष मदत केली महिला हवालदार प्रमिला निकम यांनी.

सगळा कट वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या तत्परतेने उघड

हा कट पूर्ण यशस्वी झालाही असता, पण राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना गुप्त सूत्रांकडून खेड शिवापूर चौकीत काहीतरी संशयास्पद घडत असल्याची कुणकुण लागली. आपले बिंग फुटल्याचा संशय आल्याने निकम यांनी जाधव यांना फोन करून खोटी माहिती दिली की मोठी रोकड पकडली आहे. पण जाधव वेळ न दवडता तातडीने चौकीत पोहोचले, आणि त्यांच्या अचानक येण्याने भ्रष्ट पोलीस आणि तोतया पत्रकाराची अक्षरशः तारांबळ उडाली. पैसे लपवताना चौकीत पैशांचा जणू पाऊसच पडला. जाधव यांनी स्वतः पैशांची मोजदाद केली तेव्हा मोठी तफावत आढळली, आणि अखेर डिकीत लपवलेले वीस लाख समोर आले. वरिष्ठांच्या दबावामुळे घाबरलेल्या टोळीला ती रक्कम तात्काळ पवार यांना परत करावी लागली.

पोलीस चौकीतील कॅमेरे बंद ?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेड शिवापूर चौकीत सीसीटीव्ही एकतर बसवलेले नव्हते किंवा बंद ठेवलेले होते. पण चौकीसमोरच्या एका हॉटेलचा कॅमेरा मात्र सुरू होता, आणि त्यातच आशिष तिवारीने पैसे काढून डिकीत लपवतानाचा आणि प्रमिला निकम यांच्या सहभागाचा संपूर्ण प्रकार कैद झाला. हाच निर्णायक पुरावा ठरला.

या घटनेनंतर संतोष जाधव यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेजसह गोपनीय अहवाल सादर केला. गुन्हा मूळचा नऱ्हे म्हणजेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ उपायुक्त सागर कवडे यांनीही याची गंभीर दखल घेतली. सुरुवातीच्या एफआयआरमध्ये पोलिसांची नावे नव्हती, पण सीसीटीव्ही पुरावे समोर येताच पुरवणी गुन्हा दाखल करत प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांना सहआरोपी करण्यात आले.

आशिष तिवारीला अटक तर आठ आरोपी फरार

आशिष तिवारीला नऱ्हे पोलिसांनी 24 जुलैला रात्री अटक केली असून, न्यायालयाने त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांवर दरोडा, अपहरण, खंडणी, कट रचना आणि तोतयागिरीच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. आशिष तिवारी, विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम यांना अटक झाली आहे, पण प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांच्यासह सहा आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस खात्यातलेच लोक फरार असल्याने तपासाच्या पद्धती आणि पळवाटा त्यांना आधीच माहीत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

प्रमिला निकम यांचा हा पहिलाच कारनामा नव्हता.

एका बातमीनुसार प्रमिला निकम यांचा हा पहिलाच प्रताप नव्हता. काही दिवस आधी याच चौकीत दाखल झालेली एक गंभीर पोक्सो तक्रार दाबण्याचा आणि तिला अपघात भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, आणि त्यावेळीही संतोष जाधव यांच्याच हस्तक्षेपामुळे सत्य समोर आले होते.

मंडळी हा दरोडा फक्त एक कोटी रुपयांचा नव्हता, तर तो सामान्य माणसाच्या पोलिसांवरच्या विश्वासावर घातलेला दरोडा होता. पोलीस चौकीतच लुटीच्या पैशांची वाटणी होते, यातून व्यवस्था आतून किती पोखरली गेली आहे हे दिसते. तोतया पत्रकारांचा सुळसुळाट आणि पोलीस चौक्यांमधला सीसीटीव्हीचा अभाव या दोन्ही गोष्टी थांबवल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. संतोष जाधव यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी असतात म्हणून अशी प्रकरणे उघडकीस येतात, पण प्रश्न हा उरतोच की निकम यांच्यासारख्या प्रवृत्तींवर आधीच कठोर कारवाई का झाली नाही? फरार आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाली, तरच खाकी वर्दीवरचा उडालेला विश्वास पुन्हा उभा राहू शकेल. तुम्हाला काय वाटते, अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्थेत नेमके काय बदलायला हवे? तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक : सरकारची पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची तयारी, काँग्रेसचा स्पष्ट विरोध

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी. दोन तृतीयांश बहुमतासाठी जोरदार हालचाली. काँग्रेसने थेट नकार देत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top