• Home
  • Breaking News
  • पाकिस्तानी गँगस्टरचं महाराष्ट्रात नेटवर्क, 112 जण ताब्यात
Image

पाकिस्तानी गँगस्टरचं महाराष्ट्रात नेटवर्क, 112 जण ताब्यात

एक फोन कॉल. एक सोशल मीडिया मेसेज. आणि हजारो किलोमीटर दूर बसलेला एक माणूस, जो महाराष्ट्रातल्या एका सर्वसामान्य तरुणाचं आयुष्य कायमचं बदलून टाकू शकतो. शुक्रवारी पहाटे साडेसातच्या सुमारास मुंबईतल्या कुर्ल्यात, वांद्र्याच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये, तर कुठे जालन्याच्या एका छोट्या तालुक्यात एकाच वेळी दीडशेहून अधिक ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यांनी  कोणालाही कसलाही सुगावा लागू दिला नाही. एटीएसच्या चौदाही युनिट्सनी एकाच क्षणी छापे टाकले आणि काही तासांतच राज्यभरातून ११२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या सगळ्यांचे कारण मात्र एकच होते. पाकिस्तानात बसलेल्या शहजाद भट्टी नावाच्या कुख्यात गुंडाशी असलेला  डिजिटल संबंध. ही कारवाई नेमकी का झाली ? शहजाद भट्टी कोण आहे ? त्याचं जाळं महाराष्ट्रात कुठवर पसरलंय आणि तो तरुणांना नेमकं कसं लक्ष्य करतोय, सगळं सविस्तर वाचा….

ATS ने महाराष्ट्रात कुठे कुठे कारवाई केली ?

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने शुक्रवारी सकाळी राज्यभरात एक मोठी मोहीम राबवली. मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांसोबतच जालना, बीड, अहिल्यानगर, धाराशिव आणि नाशिकमधील मालेगाव इथेही एटीएसची पथकं धडकली. या संपूर्ण कारवाईमागचं कारण एकच होतं, पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड शहजाद भट्टी आणि त्याच्या नेटवर्कशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असलेला संपर्क. या प्रकरणाची पाळंमुळं मात्र काही आठवडे जुनी आहेत. काही आठवड्यांपूर्वीच एटीएसने राज्यात चाळीसहून अधिक ठिकाणी अशीच कारवाई करत डझनभर जणांची चौकशी केली होती. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, अकोला, नांदेड, नालासोपारा आणि मीरा रोड इथे त्यावेळी छापे टाकण्यात आले होते. त्या प्राथमिक तपासातूनच भट्टीच्या नेटवर्कचे धागेदोरे हाती लागले आणि हे जाळं किती खोलवर पसरलेलं असू शकतं याची कल्पना यंत्रणांना आली. त्यातूनच शुक्रवारची ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आखली.

शहजाद भट्टी कोण आहे ?

आता प्रश्न पडतो की हा शहजाद भट्टी नेमका आहे कोण आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार भट्टी मूळचा पाकिस्तानच्या लाहोर शहरातील रहिवासी आहे. त्याचं नेमकं वय अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही, पण उपलब्ध माहितीनुसार तो अंदाजे पंचेचाळीस वर्षांच्या आसपासचा असावा. सध्या तो दुबईतून आपलं नेटवर्क चालवत असल्याचं आणि पाकिस्तान व मध्य पूर्वेदरम्यान सातत्याने प्रवास करत असल्याचं तपासात समोर आलंय. सुरक्षा यंत्रणांना त्याच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी म्हणजेच आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे, मात्र हे संबंध अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेले नाहीत, तो केवळ तपासाचा एक भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं. गेल्या काही महिन्यांपासून भारतातील दहशतवादी भरती, कट्टरतावाद आणि हेरगिरीशी संबंधित डझनभर प्रकरणांमध्ये त्याचं नाव सातत्याने समोर येत राहिलं आहे, आणि त्यामुळेच तो केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

भट्टीचे नेटवर्क काम कसे करते ?

भट्टीची कार्यपद्धती ही नव्वदच्या दशकातल्या जुन्या पद्धतीच्या अंडरवर्ल्डपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि तितकीच धोकादायक आहे. तो थेट शस्त्रं किंवा स्फोटकं भारतात पाठवत नाही, तर इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुकसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांचं ब्रेनवॉशिंग करतो. ही प्रक्रिया अत्यंत हळू आणि पद्धतशीरपणे राबवली जाते. सुरुवातीला अगदी साध्या संवादातून संपर्क साधला जातो, एखाद्या सोशल मीडिया पोस्टवरची कमेंट, एखादा ग्रुप, किंवा एखादा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म याचं माध्यम बनतो. हळूहळू विश्वास कमावला जातो आणि मग महागड्या गाड्या, आलिशान आयुष्य, शस्त्रांचे व्हिडिओ आणि पैशांची भुरळ दाखवली जाते. एकदा हा विश्वास पक्का बसला की मग तरुणांना छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतवलं जातं. कधी एखाद्या ठिकाणाची रेकी करायला सांगितली जाते, तर कधी काही रक्कम किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम दिलं जातं. तपास यंत्रणांच्या मते यातल्या अनेक तरुणांना ते कोणासाठी काम कट आहेत हे देखील माहित नसते… बेरोजगार तरुण, विविध लहानमोठ्या व्यवसायांत असलेले तरुण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले मध्यमवर्गीय तरुण हे या नेटवर्कचं मुख्य टार्गेट असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय, कारण अशा व्यक्तींना पैशांचं किंवा चांगल्या आयुष्याचं आमिष दाखवणं तुलनेने सोपं ठरतं.

महाराष्ट्रातल्या तरुणालाच का टार्गेट केले जाते ?

महाराष्ट्रातील तरुणांना विशेषतः लक्ष्य का केलं जातंय, याचं उत्तरही याच तपासातून मिळतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई, ठाणे व पुणे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. या आर्थिक ताकदीमुळेच इथे खंडणीखोरीसारख्या गुन्हेगारी कारवायांसाठी मोठा वाव असतो. शिवाय राज्याचा मोठा समुद्रकिनारा हा नेहमीच सीमापार बसलेल्या गुन्हेगारी नेटवर्कसाठी तस्करीचा मार्ग म्हणून वापरला जाऊ शकतो असा संशय सुरक्षा यंत्रणांना असतो. या दोन्ही गोष्टींमुळे महाराष्ट्र हे भट्टीसारख्या नेटवर्कसाठी एक मोक्याचं आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठिकाण ठरतं, आणि म्हणूनच वारंवार इथे मोठ्या मोहिमा राबवाव्या लागतात.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार भट्टीच्या काही व्हिडिओंमध्ये धर्म, भारत पाकिस्तान संबंध आणि विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भडकावणारा कन्टेट असल्याचा आरोप आहे. या प्रकारच्या कंटेंटच्या माध्यमातून तो आधी तरुणांच्या मनात असंतोष आणि राग निर्माण करतो आणि नंतर त्याच भावनेचा वापर करून त्यांना आपल्या नेटवर्कमध्ये ओढतो. हे तंत्र अत्यंत सूक्ष्म आणि दीर्घकालीन असतं, त्यामुळे एखादा तरुण या जाळ्यात ओढला जातोय हे त्याच्या कुटुंबीयांच्याही सहजासहजी लक्षात येत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भट्टीच्या नेटवर्कशी जोडलेली डोगरा गँग नावाची आणखी एक टोळी असल्याचाही एटीएसला संशय आहे, आणि या टोळीच्या हालचालींचाही तपास सुरू आहे.

भट्टीचे हे नेटवर्क पोलीसासमोर कसे आले ?

पण या संपूर्ण प्रकरणाला सिरिअस घेतले ते दिल्लीतल्या एका घटनेमुळे, काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित दोन मॉड्युल उद्ध्वस्त करत दिल्ली आणि पंजाबमधून सहा जणांना अटक केली होती. चौकशीत जे समोर आलं ते संपूर्ण देशाला हादरवणारं होतं. भट्टीच्या थेट सूचनेवरून दिल्लीतल्या अत्यंत गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचला जात होता. सिव्हिल लाईन्समधली नवी पोलीस लाईन, आनंद विहार आंतरराज्यीय बस टर्मिनल, एक रेल्वे स्टेशन आणि दिल्लीतल्या गर्दीच्या बाजारपेठा या सगळ्यांची आधीच बारकाईने रेकी करण्यात आली होती आणि त्याचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईल फोनमधून जप्त करण्यात आले. दानिश उर्फ चांद मियाँ नावाच्या एका आरोपीला ही रेकी आणि हल्ल्याच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, आणि हे काम यशस्वीरित्या पार पडल्यास त्याला वीस हजार रुपये देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्याचा साथीदार सलमान याच्यावर हल्ल्याचं चित्रीकरण करून ते फुटेज एका बंदी घातलेल्या मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून थेट भट्टीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या सहा आरोपींचा पाकिस्तानातून भट्टीसाठी काम करणाऱ्या आणखी दहा जणांशीही थेट संपर्क असल्याचं तपासात उघड झालं. हीच घटना संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणांना जागं करणारी ठरली, कारण यातून हे स्पष्ट झालं की भट्टीचं नेटवर्क केवळ ऑनलाईन भडकावण्यापुरतं मर्यादित नसून प्रत्यक्ष हिंसक कारवाया घडवण्याइतपत पुढे गेलं होतं. यानंतरच महाराष्ट्र एटीएसने आपली मोहीम अधिक व्यापक आणि आक्रमक केली.

ही कारवाई कशी केली ?

शुक्रवारच्या कारवाईबद्दल बोलायचं झालं तर एटीएसच्या चौदाही युनिट्सनी एकत्र येत ही मोहीम राबवली, आणि हे या पथकाने आतापर्यंत केलेलं सर्वात मोठं ऑपरेशन मानलं जातंय. ताब्यात घेतलेल्या ११२ जणांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सोशल मीडिया अकौंट जप्त करून सायबर सेलमार्फत त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यातून प्रत्येकी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून, भट्टीच्या युजर आयडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा संशय त्यांच्यावर आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की ही चौकशी अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे आणि आतापर्यंत कोणतीही अटक किंवा ठोस गुन्हेगारी कटाचा दावा करण्यात आलेला नाही. संशयितांच्या डिजिटल उपकरणांची आणि चॅट्सची सखोल तपासणी झाल्यानंतरच पुढील दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेश एटीएसनेही याआधी नोएडामधून भट्टीच्या नेटवर्कशी थेट संपर्कात असलेल्या काही जणांना ताब्यात घेतलं होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हे नेटवर्क केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रापासून दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत देशभर पसरलेलं आहे, आणि वेगवेगळ्या राज्यांच्या तपास यंत्रणा आता एकत्रितपणे या नेटवर्कचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागरिकांमध्ये मोठी खळबळ

एटीएसच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, संशयितांमधील संवाद, संपर्काचा उद्देश आणि त्यातून काही ठोस आर्थिक व्यवहार झाला होता का, या तीन मुद्द्यांवर सध्या बारकाईने तपास केंद्रित आहे. या तपासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भट्टीने महाराष्ट्रात कोणतीही मोठी दहशतवादी घटना किंवा सामाजिक अशांतता घडवण्याचा प्रत्यक्ष कट रचला होता का, हे निश्चित करणं. यासाठी बंद दाराआड सुरू असलेली चौकशी अनेक दिवस चालण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण मोहिमेमुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर देखील या कारवाईबाबत चर्चांना उधाण आलंय.

प्रकरणाबद्दल काय वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा chanel ला sabscribe करायला विसरू नका.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक : सरकारची पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची तयारी, काँग्रेसचा स्पष्ट विरोध

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी. दोन तृतीयांश बहुमतासाठी जोरदार हालचाली. काँग्रेसने थेट नकार देत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top