तुम्ही एका चित्रपटासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहता. सेन्सर बोर्डाच्या कात्रीतून तो कसाबसा सुटतो. अखेर तो प्रदर्शित होतो आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत, तो चित्रपट प्लॅटफॉर्मवरून गायब होतो. अभिनेता दिलजीत दोसांझच्या सतलज या चित्रपटासोबत नेमकं हेच घडलंय. भारतात हा चित्रपट आता पाहताच येत नाही आणि यामुळे मोठा वाद उभा राहिलाय. सेन्सर बोर्डाशी तीन वर्षांच्या लढाईनंतर हा चित्रपट अखेर कोणाच्या इशाऱ्यावरून हटवला गेला, या चित्रपटाच्या कथेत असं काय दडलंय की सरकारला ते दाखवायची भीती वाटते. असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. तर काय आहे संपूर्ण प्रकरण ? वाचा सविस्तर
सतलजचे तीनदा नावं बदलावे लागले !
मित्रांनो हनी त्रेहान या दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं मूळ नाव घल्लूघारा असं होतं, हा शब्द शीख इतिहासातील 1746, 1762 आणि 1984 सालच्या हत्याकांडांसाठी वापरला जातो. पुढे हे नाव बदलून पंजाब 95 करण्यात आलं आणि शेवटी सेन्सर बोर्डाच्या दबावामुळे सतलज या तिसऱ्या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करावा लागला. ही कथा पंजाबमधील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित आहे. दिलजीत दोसांझ यांनी खालरा यांची भूमिका साकारली असून अर्जुन रामपाल, कंवलजीत सिंह, सुविंदर विकी आणि गीतिका विद्या ओहल्यान हे कलाकारही या चित्रपटात आहेत.
कोण होते जसवंत सिंह खालरा ?
आता जसवंत सिंह खालरा नेमके कोण होते हे समजून घेऊया. 1952 साली अमृतसर जिल्ह्यातील खालरा गावात जन्मलेले हे कार्यकर्ते 1984 ते 1994 या दशकभरात पंजाबमध्ये दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली घडलेल्या मानवाधिकार उल्लंघनांविरोधात लढले. सुमारे पंचवीस हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर बेकायदेशीरपणे गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यातील अनेकजण पोलीस कोठडीत घेतल्यानंतर बेपत्ता झाले होते, असं त्यांचं म्हणणं होतं. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलं. पण 1995 साली खालरा स्वतःच पोलीस कोठडीतून बेपत्ता झाले आणि पुढे त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात नंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं.
सतलज चित्रपट वादात का आहे ?
आता या चित्रपटाभोवतीचा वाद समजून घेऊया. निर्मात्यांनी 2022 च्या अखेरीस सेन्सर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. सुरुवातीला बोर्डाने एकवीस कट सुचवले, पण ही संख्या हळूहळू वाढत जाऊन शंभरहून अधिक झाली. काही वृत्तांनुसार बोर्डाने चक्क खालरा यांचं नावसुद्धा चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात कट स्वीकारणं निर्मात्यांना मान्य नव्हतं, त्यामुळे चित्रपट वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला. अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याऐवजी निर्मात्यांनी थेट ओटीटीवर, कोणतेही कट न करता, हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तीन जुलैला सतलज हा चित्रपट झी5 वर विनाकाटकुट प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी टीमने जाणीवपूर्वक प्रचार टाळला होता, कारण जास्त प्रसिद्धी झाल्यास चित्रपट प्रदर्शितच होणार नाही अशी भीती त्यांना होती.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिलजित दोसांज ची प्रतिक्रिया..
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिलजीत दोसांझच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक झालं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रदर्शनानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांतच, म्हणजे रविवारी संध्याकाळी, हा चित्रपट झी5 वरून भारतातील प्रेक्षकांसाठी अचानक हटवण्यात आला. काही प्रेक्षकांनी तर सांगितलं की चित्रपट पाहत असतानाच मध्येच तो गायब झाला. झी5 ने सुरुवातीला हटवण्यास नकार दिला होता आणि सरकारकडून लेखी आदेश आल्याशिवाय आपण चित्रपट काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण रविवारी संध्याकाळी सरकारचं औपचारिक निर्देश येताच प्लॅटफॉर्मने चित्रपट हटवला.
हा चित्रपट हटवण्याचे कारण काय ?
हा या प्रकरणातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत केंद्र सरकारने हा आदेश दिला आणि हे राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र हा आदेश अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही आणि सरकारने यावर अधिकृत भाष्यही केलेलं नाही. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त भारतातूनच हटवण्यात आला असून झी5 ग्लोबलवर तो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी अजूनही उपलब्ध आहे.
चित्रपट हटवल्यानंतर दिलजीत दोसांझने काय प्रतिक्रिया दिली ?
त्याने सांगितलं की शुक्रवारीच त्याला जाणवलं होतं की हा चित्रपट कधीही बॅन होऊ शकतो. सोमवारी सरकारी कार्यालयं उघडल्यावर बंदी येईल असं त्याला वाटत होतं, पण रविवारी संध्याकाळीच हे घडेल याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळेच टीमने आधीच जाहिरात करणं टाळलं होतं, असं त्याने स्पष्ट केलं. चित्रपट हटवला गेला असला तरी वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांना अखेर हा चित्रपट पाहता आला याचं समाधान असल्याचंही तो म्हणाला. दिग्दर्शक हनी त्रेहान यांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नसल्याचं म्हटलं. झी5 ने मात्र आपल्या निवेदनात चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आपण या चित्रपटामागे ठामपणे उभे असल्याचं सांगितलं.
याबाबत प्रेक्षक काय म्हणताय ?
चित्रपट हटवला गेल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय. अनेकांनी याला थेट सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असल्याचं म्हटलंय. याहून अस्वस्थ करणारा मुद्दा म्हणजे काश्मीर फाइल्स, केरळ स्टोरी आणि बंगाल फाइल्ससारखे वादग्रस्त चित्रपट अजूनही याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, मग फक्त सतलजवरच ही कारवाई का, असा सवाल टीकाकार विचारत आहेत. काहींनी तर असंही निरीक्षण नोंदवलं की ज्याप्रमाणे जसवंत सिंह खालरा स्वतः अचानक बेपत्ता झाले होते, त्याचप्रमाणे त्यांच्यावरचा हा चित्रपटही अचानक गायब करण्यात आला, हा योगायोग अनेकांना बोचणारा वाटतोय.
हे प्रकरण आणखी एका कारणामुळे महत्त्वाचं ठरतंय, ते म्हणजे पंजाबमधलं राजकीय वातावरण. यापूर्वी माचिस आणि उडता पंजाब सारख्या चित्रपटांनी वादग्रस्त विषयांना हात घालत निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम केला होता. उडता पंजाबनंतर अमली पदार्थांचा मुद्दा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा ठरला आणि त्याचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. आता सतलजच्या निमित्ताने पंजाबच्या जुन्या आणि वेदनादायी इतिहासावर पुन्हा चर्चा सुरू झालीय.
सतलज आता प्रेक्षकांना कधी पाहता येईल ?
सध्या सतलज हा चित्रपट पुढील आदेशापर्यंत भारतात कोणत्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाही. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतिहासातलं सत्य मांडण्याचा कलाकाराचा हक्क आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारने सांगितलेली राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी आहे. पण या साऱ्या वादात नुकसान झालंय ते प्रेक्षकांचं, ज्यांनी तीन वर्षे वाट पाहिली आणि हातात आलेली कलाकृती दोन दिवसांतच हिरावून घेतली गेली. हा वाद आता कोर्टात जाणार का, सरकार याबाबत स्पष्टीकरण देणार का आणि सतलज भारतीय प्रेक्षकांना पुन्हा अधिकृतपणे पाहायला मिळणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
बाकी या विषयावर तुमचं मत काय, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.















