शेखूच्या भाच्याची हत्या आणि आता नागपूर मध्ये gangwarची ठिणगी ?
नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्वीकारला आणि काही तासांतच शहरातल्या सर्वात गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाचा जीव गेला. कारण अगदी क्षुल्लक होतं, जागेवरून झालेलं भांडण. पण या भांडणाने शहरातल्या एका जुन्या आणि रक्तरंजित गँग वार ला जागे केले. कारण मेलेला तरुण कुणाचा तरी भाचा होता. आणि तो मामा म्हणजे नागपूरच्या गुन्हेगारी दुनियेतलं असं नाव आहे, जे ऐकून आजही शहरातले जुने पोलीस अधिकारी सावध होतात. हा खून फक्त एक भांडण नाही तर एका नव्या गँगवॉरची ठिणगी असू शकते, अशी चर्चा अवघ्या काही तासांत नागपूरभर पसरली.
वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची पदभार स्वीकारल्यावर काय सांगितले ?
वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. निवर्तमान पोलीस आयुक्तांकडून सूत्रं हातात घेताना संपूर्ण शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह होता. दहशतवादविरोधी कारवायांमधला अनुभव, शौर्य पदक विजेती कारकीर्द आणि कडक शिस्तीची प्रतिमा घेऊन आलेल्या या अधिकाऱ्याकडून नागपूरकरांना मोठ्या अपेक्षा होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आधी शहराचा, इथल्या गुन्हेगारीचा आणि पोलीस यंत्रणेचा बारकाईने अभ्यास केला जाईल, त्यानंतरच ठोस रणनीती आखली जाईल आणि अंमलात आणली जाईल.
शेखू gang आणि पांडे gang ठिणगी कशी पडली ?
शहरातल्या लोकांना वाटलं आता निवांतपणा येईल, शिस्त येईल. पण नागपूर शहराने नव्या आयुक्तांची परीक्षा फार लवकर घेतली. पदभार स्वीकारल्याच्याच दिवशी संध्याकाळी शहरातला सर्वात गजबजलेला परिसर फुटाळा, एका निर्घृण खुनाने हादरला.
फुटाळा हा नागपूरचा असा भाग आहे जिथे संध्याकाळी शेकडो लोक फेरफटका मारायला येतात. तळ्याकाठी खाण्याचे स्टॉल, गर्दी, गप्पा आणि मौजमजा हे इथलं नेहमीचं चित्र आहे. कुटुंबांसह मुलं-बाळं, तरुण मित्रमैत्रिणी, फेरीवाले अशी सगळी वर्दळ इथे रोज संध्याकाळी असते, आणि म्हणूनच हा भाग शहरातला एक सुरक्षित, निवांत परिसर मानला जातो. याच गर्दीत त्या दिवशी असद उर्फ अमन खान आपल्या मित्रांसोबत बसला होता. काही बातम्यांनुसार ती जागा आधीपासूनच योगेंद्र उर्फ लाला पांडे या तरुणाची नजर होती. सोमवारी संध्याकाळी अमन तिथे आला आणि त्याचवेळी लाला पांडेही तिथे आला. दोघांमध्ये त्याच जागेवरून शाब्दिक वाद सुरू झाला, जो आधीपासूनच धुसफुसत असल्याची चर्चा आहे. वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात अमनने लाला पांडेच्या थोबाडीत मारली.
त्या क्षणी लाला पांडे काहीच बोलला नाही. चूप राहून तिथून निघून गेला. अमनला वाटलं विषय इथेच संपला. पण खरा विषय आत्ताच सुरू झाला होता. लाला पांडेने आपला भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि साथीदार दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांना तातडीने फोन लावला आणि पोरांना घेऊन ताबडतोब फुटाळ्याकडे बोलावलं. काही मिनिटांतच लाला पांडेची टोळी गर्दीतून वाट काढत तिथे पोहोचली.
एवढी पोरं एकत्र येताना पाहून अमनचा एक मित्र भांडण मिटवण्यासाठी मध्ये पडला. पण टोळीने त्याच्यावरच चाकू आणि तलवारीने वार केले. हे पाहून अमन मध्ये आला, तर हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार सुरू केले. जीव वाचवण्यासाठी अमन पळत सुटला, आणि हातात हत्यारं घेतलेली पोरं गर्दीतून त्याच्या मागे धावत राहिली. आजूबाजूला शेकडो लोक असतानाही, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा पाठलाग सुरू होता. कुणीही मध्ये पडायचं धाडस करत नव्हतं. जसा अमन टप्प्यात आला, जंगली पांडेने त्याच्यावर वार केला आणि अमन जागीच कोसळला. टोळीने त्याला घेराव घालून आणखी वार केले आणि नंतर सगळे तिथून पळून गेले.
गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त नव्हती का ?
काही सेकंदात हे सगळं संपलं, आणि जिथे थोड्या वेळापूर्वी लोक निवांत फिरत होते, तिथे आता किंकाळ्या आणि गोंधळ पसरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमन आणि त्याच्या जखमी मित्र मयूर जाधवला स्थानिकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. मयूरवर उपचार सुरू झाले, पण अमनला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. घटनास्थळी पोलीस पोहोचले, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की अमनवर वार करणारे चौघे अल्पवयीन नाहीत. चौघांना अटक करण्यात आली, पण मुख्य सूत्रधार लाला पांडे आणि जंगली पांडे फरार झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी असंही सांगितलं की घटनेच्या वेळी त्या भागात पोलीस गस्त नव्हती, ज्यामुळे भररस्त्यातल्या या हत्येनंतर सुरक्षेवर गंभीर प्रश्न उभे राहिले. नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः घटनास्थळाला भेट दिली आणि तपास अधिकाऱ्यांना चोवीस तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्याचे कडक आदेश दिले.
नागपूरमध्ये gangwar चा इतिहास काय आहे ?
पण खरी खळबळ उडाली ती एका नात्यामुळे. मृत अमन शेखचा मामा म्हणजे गुलनवाज खान उर्फ शेखू खान, नागपूरच्या गुन्हेगारी इतिहासातलं एक दहशतीचं नाव आहे. शहरात इप्पा गँग, हाजी गँग, राजा गौस गँग, आबू गँग असे अनेक गट वर्षानुवर्षे सक्रिय राहिले, पण दहशत आणि होल्डच्या बाबतीत शेखू गँगने या सगळ्यांना मागे टाकलं. 2007-08 च्या सुमारास अंबाझरी, गिट्टीखदान आणि खापरखेडा भागात चोऱ्या-मारामाऱ्या यांसारखे लहानसहान गुन्हे करणारा गुलनवाज हळूहळू पोरं जमवत गेला आणि स्वतःची गँग उभी केली. दरोडे, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणं, शस्त्रांची तस्करी, पैसे घेऊन प्रवेश मिळवून देणं, अवैध दारूचा धंदा आणि सुपारी घेऊन खून अशा अनेक मार्गांनी त्याने पैसा आणि दहशत दोन्ही कमावलं. शहरातले जुने प्लेयर्स आधीच स्थिरावलेले असतानाही शेखूने त्यांना बाजूला सारत थेट खोडावरच घाव घातला.
2013 च्या सुमारास एका कुख्यात व्यावसायिकाने शेखूला भाजप युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्षाची सुपारी दिली. फेब्रुवारी 2013 मध्ये शंकरनगर चौकात तीन गोळ्या झाडून शेखूने तो खून केला आणि त्याची दहशत अजून वाढली. यानंतर तो कायमचा फरार आणि वॉन्टेड गुन्हेगार बनला, पण गँगचा कारभार त्याचा भाऊ शहरोज सांभाळत राहिला. वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी शेखूवर मोक्का लावून त्याला जेलमध्ये टाकलं, आणि नंतर शहरोजवरही मोक्का अंतर्गत कारवाई झाली. काही काळाने तुरुंगातून सुटल्यावर शहरोजने प्रॉपर्टी डीलिंगच्या नावाखाली शहरावरची पकड आणखी घट्ट केली, आणि साहजिकच बाकी गँगचा प्रभाव त्यामुळे कमी झाला.
शेखू gang VS हिरणवार gang
मग आली जुलै 2022 ची रात्र. शहरोज आपल्या गाडीत पेट्रोल टाकायला जात असताना त्याच्या गाडीचा एका रिक्षाला हलकासा धक्का लागला. पण रिक्षातून उतरलेल्या आठ जणांनी लोखंडी रॉड आणि पेवर ब्लॉकने हल्ला करून शहरोजचा भररस्त्यात खून केला. या हल्ल्याचा सूत्रधार होता हिरणवार गँगचा लीडर पवन हिरणवारचा भाऊ. आपल्या सख्ख्या भावाचा असा भररस्त्यात खून झाल्याचं कळताच जेलमध्ये असलेल्या शेखूने तिथूनच बदल्याची योजना आखायला सुरुवात केली. जुलै 2024 मध्ये तो जेलमधून बाहेर आला, तो थेट बदल्याच्या इराद्यानेच. पण त्याने घाई केली नाही. अगदी शांतपणे रेकी केली, हिरणवार गँगशी आधीच वैर असलेल्या एका गुंडाला सोबत घेतलं आणि पाच महिने योग्य संधीची वाट पाहिली.
जानेवारी 2025 मध्ये सापळा यशस्वी ठरला. हिरणवार गँगच्या जवळच्या एका माणसाने पवन हिरणवार, त्याचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराला मंदिरदर्शनाच्या बहाण्याने नागपूरबाहेर नेलं. ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच इशारा मिळाला आणि आधीच झाडाझुडपात लपलेल्या शेखूच्या माणसांनी गाडीवर थेट गोळीबार केला. पवन हिरणवारचा जागीच मृत्यू झाला. शेखूने आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला पूर्ण केला, पण या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा मोक्का आणि इतर कठोर कलमांखाली कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकलं.
हिरणवार गँगची सूत्रं आता मृत पवन हिरणवारच्या भावाकडे आली. भावाच्या मृत्यूची सल घेऊन त्याने बदल्याची तयारी सुरू केली आणि भावाच्या हत्येत मदत करणाऱ्या दोघांना लक्ष्य करण्याचा प्लॅन आखला. एप्रिल महिन्यात एका मिरवणुकीदरम्यान त्यांना संपवण्याचा बेत होता, पण ऐनवेळी बातमी फुटली आणि दोघेही तिथे आलेच नाहीत. पहिला प्रयत्न फसला तरी त्याने माघार घेतली नाही. ऑगस्ट महिन्यात त्याने आपल्या साथीदारांसह पवन हिरणवारच्या हत्येत सामील असलेल्या एका आरोपीच्या भावाला एकट्यात गाठून गोळ्या झाडून खून केला. मृत व्यक्तीचा गँगवॉरशी थेट काहीही संबंध नव्हता, पण भावाच्या बदल्यात भाऊ एवढाच हिशेब डोक्यात ठेवून हा खून झाला. पोलिसांनी नंतर संबंधित आठ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.
या घडामोडींनंतर शेखू गँग विरुद्ध हिरणवार गँग हे जुनं वैर तात्पुरतं शांत झाल्याचं चित्र दिसू लागलं, कारण जेलमध्ये असलेल्या शेखूने कोणतीही पुढची प्रतिक्रिया दिली नाही.
नागपूर शहरात नवीन गुंड उदयाला आले ?
पण या शांततेचा फायदा शहरातल्या नव्या, लहान वयाच्या गुंडांनी घेतला. वीस-पंचवीस वर्षांची पोरं आता स्वतःला भाई म्हणवून घेऊ लागली आहेत, आणि याच नव्या पिढीतून पुढे आलं लाला पांडे आणि जंगली पांडे यांचं नाव. फुटाळ्यातल्या गर्दीत केलेल्या या खुनाने शहरात पुन्हा एकदा गँगवॉरची चर्चा सुरू झाली आहे. फरक एवढाच की यावेळी संघर्ष जुन्या शेखू विरुद्ध हिरणवार या समीकरणाचा नाही, तर शेखू गँग विरुद्ध लाला पांडे गँग असा नवा चेहरा घेऊन उभा राहतो आहे.
नांगरे पाटील या आव्हानाला कसे सामोरे जातील ?
गिट्टीखदान पोलीस ठाण्याची टीम फरार आरोपींच्या शोधात आहे आणि नव्या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या चोवीस तासांच्या मुदतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे. एका बाजूला अमन खानच्या कुटुंबाला न्याय हवाय, तर दुसरीकडे शहरातल्या सामान्य नागरिकांना प्रश्न पडलाय की उद्या आपल्या रोजच्या फिरण्याच्या जागी असंच काही घडलं तर काय. फुटाळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या तलवारी आणि चाकू घेऊन फिरणारी पोरं दिसणं हेच मुळात शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं. काही राजकीय वर्तुळातूनही नव्या पोलीस आयुक्तांच्या कार्यशैलीवर चर्चा सुरू झाली आहे, आणि आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे, नांगरे पाटील या आव्हानाला कसं सामोरं जातात.
आयुक्त नांगरे पाटील हा gangwar संपवून शहरात शांतता आणतील का ?
नागपूरने आजवर अनेक गँगवॉर पाहिल्या आहेत. अनेक भाई उदयाला आले, दहशत निर्माण केली आणि एक दिवस संपलेही. पण प्रत्येक वेळी एक नवी पिढी जुन्या दहशतीच्या राखेतून पुन्हा उभी राहताना दिसते. आता खरा प्रश्न हा आहे की नव्या पोलीस आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही जर शहरातल्या गर्दीच्या रस्त्यावर भरदिवसा खून होत असतील, तर शहरावरची खरी सत्ता नेमकी कुणाच्या हातात आहे. पोलीस स्टेशनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांच्या हातात, की अजूनही रस्त्यावर राज्य करणाऱ्या या टोळ्यांच्या हातात, हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय आयुक्त नांगरे पाटील हा gangwar संपवून शहरात शांतता आणतील का ?















