• Home
  • Breaking News
  • सिया-चेतन आणि केतन, लोहगडावर घडलेली A to Z स्टोरी
Image

सिया-चेतन आणि केतन, लोहगडावर घडलेली A to Z स्टोरी

पासपोर्ट चोरी, तीन ट्रेक, हुडी घातलेला अनोळखी माणूस, आणि एका चुकीच्या मिस call ने हे प्रकरण कसं उघडकीस आलं ?

समजा तुम्ही तुमच्या भावी पत्नीसोबत ट्रेकला जाता. वातावरण आनंदाचं आहे, लग्नाच्या तयारी सुरू आहेत, आयुष्य सुंदर वाटतंय. आणि अचानक एका क्षणात दरीतून खाली कोसळता. पण हे अपघाताने नाही. ज्या माणसावर सर्वाधिक विश्वास ठेवला, त्याच माणसाने तुम्हाला ढकललेलं असतं.
हे काही सिनेमाची कथा नाही. हे घडलं पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर. आणि या हत्याकांडाचा जेव्हा पर्दाफाश झाला, तेव्हा महाराष्ट्र हादरला. कारण या हत्येमागे होती ती माणसं ज्यांच्यावर केतन अग्रवाल या तरुणाने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता.
आजच्या या एपिसोडमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा A to Z उलगडा करणार आहोत. पासपोर्ट चोरी, तीन ट्रेक, हुडी घातलेला अनोळखी माणूस, आणि चुकलेल्या एका मोबाईलने कसं उघडकीस आलं हे सगळं सविस्तर वाचा…

केतन अग्रवाल चे लग्न ठरले १७ कोटी चे मोठे हॉटेल बुक केले


केतन अग्रवाल. वय वर्षे चोवीस. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा. या कुटुंबाने केतनचं लग्न सिया प्रवीण गोयल हिच्याशी ठरवलं होतं. साखरपुडा झाला होता, जयपूरमधील एका आलिशान पॅलेसमध्ये लग्नासाठी तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून बुकिंगही केलं होतं. नोव्हेंबरमध्ये लग्नाचा मुहूर्त ठरला होता.
सिया. बीबीएचं शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केलेली तरुणी. साखरपुडा झाला, पण सियाच्या मनात चेतन चौधरी नावाचा माणूस होता. त्यांची ओळख पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील व्यावसायिक संबंधांमधून झाली होती. हळूहळू मैत्री, मग प्रेम. पण साखरपुडा झाल्यामुळे सियाने घरच्यांना काहीच सांगितलं नाही.
केतनसोबत लग्न करायचं नव्हतं, पण त्याला सांगण्याची हिम्मत नव्हती. घरचे मानणार नव्हते. म्हणून सियाने एक वेगळाच रस्ता निवडला. आणि तो रस्ता संपत होता लोहगड किल्ल्यावरच्या एका दरीत.

पासपोर्ट चे सिक्रेट

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केतनने सियाला एक आनंदाची बातमी दिली. दोघे प्री-वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली बेटावर जाणार होते. तारीख ठरली, तिकिटं काढण्याच्या तयारीत होते. पण अचानक केतनचा पासपोर्ट सापडेना. घर धुंडाळलं, सगळीकडे शोधलं, पण पासपोर्ट गायब होता. बाली ट्रिप रद्द करावी लागली.
तेव्हा कुणाला माहीत नव्हतं की हा पासपोर्ट स्वतः सियानेच लपवला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नंतर हे उघड केलं. बालीला जाणं सियाला टाळायचं होतं, कारण तिच्या मनात वेगळाच प्लॅन आधीच तयार होता.

लोहगड किल्लाच का?


लोहगड किल्ला त्यांनी उगाच निवडला नव्हता. सियाने केतनला यापूर्वी दोनदा तिथे ट्रेकला नेलं होतं. किल्ल्यावरचे एकेक कोपरे तिला माहीत होते. कुठे सीसीटीव्ही आहेत, कुठे कडा आहे, कुठे माणसं कमी असतात, हे सगळं तिने आधीच पाहून ठेवलं होतं. दोन वेळा केतनला दरीत ढकलण्याची संधी होती, पण धाडस झालं नाही.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा जून महिन्याच्या चौदा तारखेला केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला, तेव्हा चेतन हताश झाला आणि रडू लागला. त्याने सियाला स्पष्ट सांगितलं की, हे काम आता तो स्वतः पूर्ण करेल. आणि त्याने अठरा जून ही तारीख ठरवली.


अठरा जूनचा दिवस का निवडला ?


अठरा जून. केतनचा वाढदिवस जवळच होता. सियाने त्याला बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली लोहगडावर ट्रेकसाठी नेलं. केतन खुश होता, काहीही संशय नव्हता. पण त्याच वेळी चेतन चौधरी एका वेगळ्याच मार्गाने किल्ल्यावर पोहोचला होता. संपूर्ण अंग झाकणारी हुडी घातली होती त्याने. कडक उन्हाळ्यातही हुडी. ओळख लपवायची होती.
चेतनने एक आणखी खेळी केली होती. त्याने स्वतःचा मोबाईल घरीच ठेवला. घरातल्या कामगाराचा मोबाईल घेऊन गेला, जेणेकरून त्याचं लोकेशन घरीच दिसेल. त्याच कामगाराच्या मोबाईलवरून तो सियाशी व्हॉट्सॲपवर प्रत्येक मिनिटाला संपर्कात होता. सिया कुठे आहे, केतन किती जवळ आहे, संधी केव्हा येणार, हे सगळं ट्रॅक करत होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नंतर दिसलं की सिया वारंवार मागे वळून त्या हुडी घातलेल्या माणसाकडे पाहत होती. हे संकेत होते. योग्य वेळ आल्यावर सियाने केतनला एका निर्जन कड्याजवळ नेलं. आजूबाजूला कोणी नव्हतं. पायऱ्यांजवळ दबा धरून बसलेला चेतन मागाहून आला आणि त्याने केतनला चारशे फूट खोल दरीत ढकलून दिलं.
चेतन लगेच तिथून निघून गेला. आणि मग सियाने आरडाओरडा सुरू केला. मोठमोठ्याने रडणं, गोंधळ. किल्ल्यावरच्या सुरक्षारक्षकांनी ऐकलं, पोलिसांना फोन केला. केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला.

हे प्रकरण बाहेर कसे आले ?


या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट म्हणजे केतनची बहीण. जेव्हा केतनचा मृतदेह घरी आणला तेव्हा सिया घरी आली होती. आणि सियाचं वर्तन पाहून केतनची बहीण अस्वस्थ झाली. केतनची बॉडी समोर होती. पण सिया पूर्णपणे शांत होती. कोणतीही प्रतिक्रिया नाही, डोळ्यात पाणी नाही, काहीच नाही. ते पाहूनच बहिणीच्या मनात संशयाची ठिणगी पडली.
चार दिवसांनी सिया सांत्वनासाठी पुन्हा आली. बहिणीने तिला घटनेबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. सियाची उत्तरं विसंगत होती. एक गोष्ट आधी सांगायची, नंतर वेगळीच सांगायची. ही बाब बहिणीने पोलिसांच्या कानावर घातली.
पोलिसांनी तपास सुरू केला. लोहगड परिसरातील शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. त्यात हुडी घातलेला एक संशयास्पद तरुण दिसला. त्याने उन्हाळ्यात हुडी का घातली होती? तो वारंवार सिया आणि केतनच्या मागे का फिरत होता? आणि त्याने खाणाखुणा कशासाठी केल्या?
पोलिसांनी त्या भागातील कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. एक मोबाईल नंबर उजळला. त्या नंबरचं लोकेशन मार्केटयार्डला येत होतं. पण तपासात समोर आलं की तो फोन चेतनचा होता आणि त्या वेळी तो फोन त्याच्या घरच्या कामगाराकडे होता. कामगाराच्या स्वतःच्या फोनचं लोकेशन मात्र लोहगड किल्ल्यावर येत होतं. म्हणजे चेतनच त्या कामगाराचा फोन घेऊन लोहगडावर गेला होता. हा पुरावाच त्याची फसवणूक उघड करून गेला.
त्यानंतर पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतलं. चौकशीत सगळं उघड झालं. सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघांनाही अटक करण्यात आली.

चेतन ने पोलीसा समोर काय काबुल केले ?


अटकेनंतर चेतनने पोलिसांसमोर एक वेगळी बाजू मांडली. त्याने सांगितलं की, त्याला सियासोबत पळून जाऊन नव्याने आयुष्य सुरू करायचं होतं. मात्र सियाचाच हट्ट होता की पळून गेलो तरी सियाचं श्रीमंत कुटुंब त्यांना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधेल. खून हाच एकमेव उपाय असल्याचं सियानेच ठरवल्याचा त्याचा दावा आहे.
सियाने मात्र पूर्णपणे उलट सांगितलं. ती म्हणाली, हत्येचा कट सुरुवातीपासूनच चेतनने आखला होता. चौदा जून रोजी प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा चेतनच रडला आणि त्याने जबाबदारी स्वतः घेतली. आता न्यायालयात दोघेही एकमेकांवर खापर फोडत आहेत.
लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत. हुशारीने डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डेटा रिकव्हर केला जाणार आहे. हा डेटा हाती आल्यावर संपूर्ण कट कोर्टात सिद्ध करणं पोलिसांना अधिक सोपं होणार आहे. दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याबद्दल कसलाही पश्चात्ताप दिसलेला नाही.


लोहगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार. इतिहासात अनेक लढाया पाहिलेला हा किल्ला आजही उभा आहे. पण या महिन्यात त्याने एक वेगळाच इतिहास पाहिला. एका चोवीस वर्षाच्या तरुणाचा खून. थंड डोक्याने. नियोजन करून. आणि हसत.
केतन अग्रवालला माहीत नव्हतं की ज्या ट्रेकला तो उत्साहाने गेला होता, तो त्याचा शेवटचा ट्रेक ठरेल. त्याने विश्वास ठेवला होता त्या माणसांनी विश्वासघात केला.
एक प्रश्न मनात येतो. या दोन आरोपींनी जे केलं त्यामागे प्रेम होतं की केवळ स्वार्थ? कारण ज्या नात्यात दुसऱ्याचा जीव घेण्याची तयारी असते, त्याला प्रेम म्हणता येतं का? हा प्रश्न तुम्हीच ठरवा.

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक : सरकारची पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची तयारी, काँग्रेसचा स्पष्ट विरोध

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याची केंद्र सरकारची तयारी. दोन तृतीयांश बहुमतासाठी जोरदार हालचाली. काँग्रेसने थेट नकार देत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top